छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) water scarcity problem मराठवाड्यात पाणी संकट दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. मराठवाड्याची अनेक गावांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु पाणी चोरीला जावू नये म्हणून सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्याची भन्नाट शक्कल लढवली आहे. पाणी आणि मिरचीच्या शेतावर लक्ष ठेवण्यासाठी शेतात ३६० डिग्री सीसीटिव्ही कॅमेरा लावलाय. रामेश्वर गव्हाणे या शेतकऱ्यानं ही नामी शक्कल लढविली आहे.
पाण्याच्या निगराणीसाठी कॅमेरा: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये बोदवड या गावातील रामेश्वर गव्हाणे या शेतकऱ्याची शेती चांगलीच चर्चेत आली आहे. कारण शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये, म्हणून त्यानं आपल्या शेतात चक्क सेन्सर असलेला ३६० डिग्री असलेला कॅमेरा बसवला आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये बोदवड हे गाव अजिंठा लेणी परिसरात आहे. या ठिकाणी भीषण दुष्काळ असल्यानं पाण्याची भीषण कमतरता जाणवत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नसताना शेतीला पाणी मिळणं अवघड झालं आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना शेतकरी शेतीला पाणी पुरविण्याकरिता कसरत करत आहेत.
पाण्याची चोरी होऊ नये म्हणून...रामेश्वर यांच्या सहा एकर शेतात पाऊण एकरमध्ये शेततळे तयार करण्यात आले. सहा महिने विहिरीच्या पाण्यावर तर सहा महिने शेततळ्यातील पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. त्यात काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीनं शेततळ्यात जाऊन प्लास्टिक फाडलं. कोणीतरी पाणी नेताना खोडसाळपणा केल्याचा रामेश्वर यांना संशय आला. पाण्याची चोरी होऊ नये, याकरिता कॅमेरा लावल्याचं रामेश्वर गव्हाणे यांनी सांगितलं.
शेती आहे पाण्यावर अवलंबून: रामेश्वर गव्हाणे या शेतकऱ्यानं आपल्या शेतात मिरची आणि अद्रकाची लागवड केली. दुर्गम भागात असल्यानं इतर सुविधांसह पाण्याचा अभाव नेहमीचाच आहे. त्यामुळं उपलब्ध पाण्यातच शेतीचं नियोजन करावं लागतं. जानेवारी महिन्यापासून ते पाऊस येईपर्यंत शेततळ्यात असलेल्या पाण्यावर मिरचीचे पीक जपावे लागते. त्या भागात पाण्याची टंचाई असल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी पायपीट करण्याची नागरिकांवर वेळ येते. सेन्सर असलेला कॅमेरा आहे. त्यामुळे जिकडे हालचाल दिसेल त्या ठिकाणी कॅमेरा आपोआप हालचाली टिपण्याचं काम करतो. त्यामुळे पाणी आणि शेतातील मिरची पिकावरदेखील लक्ष ठेवणे सोपे होत असल्याचं, रामेश्वर गव्हाणे यांनी सांगितलं.
- दुष्काळाचे परिणाम: मराठवाड्यात एकीकडे भीषण पाणीटंचाई आहे तर दुसरीकडे या शेतकऱ्यांना पीक जगवणं अवघड झालं आहे. पाणी देण्यास कोणीही सहसा नकार देत नाही. कारण ते पुण्याचं मानलं जातं. मात्र दुष्काळाची दाहकता लक्षात घेता शेतकऱ्यांना पाणी जपून ठेवावं लागतं आहे.
हेही वाचा