संगमनेर : "साहेब मतदानाच्या दिवशीच पाणी आलं. पुन्हा पाणी आलंच नाही. दिवसभर काम करायचं आणि पहाटे उठून खोल दरीत जायचं. छोट्याशा झऱ्यातून तांब्यानं पाणी काढून हंडे भरायचे. पुन्हा डोक्यावर तीन हंडे घेऊन खोल दरी चढून वर यायचं. आणखी किती वर्षे आम्ही हा वनवास सहन करायचा?", अशा व्यथा संगमनेर तालुक्यातील गिर्हेवाडी, सुतारवाडी येथील आदिवासी महिलांनी मांडल्या आहेत.
पाण्यासाठीची वणवण कधी थांबणार? : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार गावांतर्गत उंच डोंगरावर गिर्हेवाही, पायरवाडी, सुतारवाडी आदी वाड्या-वस्त्या वसलेल्या असून संपूर्ण आदिवासी लोक याठिकाणी राहतात. येथील महिला-पुरूषांना दररोज रोजंदारीसाठी बाहेरगावी जावं लागतं. गावातूनच पाईपलाईनव्दारे या वाड्यांना पाणी येत असतं. पण पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं काही दिवसांपासून पाणी येत नाहीय. त्यामुळं पाण्याअभावी ग्रामस्थांचे मोठे हाल होवू लागलेत. त्यातच याठिकाणी अतिशय खोल दरीत पाण्याचा झरा आहे. सर्व आदिवासी महिला पाणी आणण्यासाठी इथं येत असतात. दरीतून वर चढताना अनेकदा पाय घसरूनही महिला पडल्या आहेत. महिलांना बिबट्याची भीतीदेखील असते. मात्र, आमच्या वेदना आजपर्यंत कोणालाच कळल्या नसल्याची खंत यावेळी महिलांनी व्यक्त केली.
दिवसभर शेतात काम करायचं . पहाटे उठून पाणी आणायचं. पण आमच्या वेदना कोणाला कळणार ? पावसाळा असो की उन्हाळा असो आमच्या नशिबी पाण्याचा वनवासच आहे. साहेबांनी एकदा तरी याठिकाणी येऊन आम्ही कशा पद्धतीनं खोल दरीतून पाणी आणतोय हे बघावं. तेव्हा त्यांना जाग येईल.- रंजना गिऱ्हे, ग्रामस्थ महिला
आमचा संघर्ष कधी संपणार? : पिण्यासाठी घोटभर पाणी मिळावं म्हणून आम्हाला झोपदेखील लागत नाही. पाणी आणून घरात स्वयंपाक करून पुन्हा रोजंदारीसाठी बाहेरगावी जावं लागतं. पाण्यासाठी आजही एवढा संघर्ष करावा लागत असल्यानं आम्हाला जीवन नकोसं झालंय. आणखी किती वर्षे आम्ही हाल सहन करायचे. विशेष म्हणजे इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. मुलांना देखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळं लहान मुलंदेखील पाणी आणण्यासाठी खोल दरीत उतरतात. आमचा पाण्यासाठीचा हा संघर्ष कधी संपणार? असा संतप्त सवालही आदिवासी महिलांनी केलाय.
- गिर्हेवाही इथं पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. येथे संपूर्ण आदिवासी मुलं शिक्षण घेतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांना भात शिजविण्यासाठीदेखील पाणी नाही. त्यामुळं अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवरून पाणी आणावं लागतंय. मुलंही घरूनच पिण्यासाठी पाणी घेऊन येत असल्याचं, गिर्हेवाडी शाळेचे मुख्याध्यापक विजय कांबळे यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- जीवन वाचविणारे पाणीच ठरतेय मृत्यूला आमंत्रण: मेळघाटातील गामस्थांना मूत्रपिंडाचे आजार, अनेकांचे मृत्यू - Amravati water issue
- Dabhadi Village Water Crisis : दाभाडी गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण; सरकारी योजना केवळ कागदावरचं
- Sangli Water Issue Story : आजी-माजी सरपंच दाम्पत्याने मिळून एका विहीरीतून गावच्या पिण्याचा प्रश्न कायमचा सोडवला, वाचा सविस्तर