मुंबई Voter Turnout Increased Issue : राज्यातील तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकांमधील आकडेवारी निवडणूक आयोगाने चार दिवसांनी प्रसिद्ध करत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे जाहीर केले आहे; मात्र या वाढलेल्या टक्केवारीमध्ये सत्ताधाऱ्यांची चाल असल्याचा आरोप करत विरोधकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात बोलताना सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे.
ही तर फक्त पळवाट- वाघमारे : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे म्हणाले की, विरोधकांची ही केवळ पळवाट आहे. आता त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. वास्तविक मतदान हे पाच वाजता संपत नाही तर पाच वाजता मतदान केंद्राच्या आवारात असलेल्या सर्व मतदारांना मतदान करू दिले जाते. त्यामुळे मतदानाची प्रत्यक्षात वेळ ही साडेसात किंवा आठ वाजता मतदान संपते. पाच वाजता जाहीर झालेली आकडेवारी ही अंतिम आकडेवारी नसते. आठ वाजल्यानंतरसुद्धा सर्व मतदान केंद्रावरून आकडेवारी गोळा होऊन ती दुसऱ्या दिवशी जाहीर केली जाते. तोपर्यंत निश्चितच आकडेवारीत वाढ झालेली असते. त्यामुळे जाणीवपूर्वक ही वाढ केली जाते आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. विरोधकांना त्यांचा पराभव दिसतो आहे. म्हणून ही त्यांच्याकडून केवळ पळवाट दिली जाते आहे, असं वाघमारे म्हणाले.
पराभवाचे खापर इतरांच्या माथी : या संदर्भात बोलताना भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, या तीनही टप्प्यांमध्ये महायुतीला जोरदार मतदान झाले आहे आणि ही मतदानाची टक्केवारी लक्षात आल्यामुळे आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांना पराभवाचे खापर कुणाच्यातरी माथी फोडायचे आहेत. त्यामुळे आता मतदानाची टक्केवारी वाढल्याची अफवा ते उठवत आहेत. तर निवडणूक आयोगाने स्वतःच यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मतांची टक्केवारी वाढली असे म्हणणे योग्य नाही. निवडणूक प्रक्रिया अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे, असं केशव उपाध्ये यांनी सांगितलं.
प्रक्रिया समजून घेणे गरजेचे- पारकर : या संदर्भात बोलताना राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर म्हणाले की, वास्तविक सर्वांनी निवडणूक प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये दुपारी मतदान वाढत्या उन्हामुळे कमी होते. त्यामुळे मतदार हे सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अनेक निवडणूक केंद्र ही दुर्गम भागात आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पाच वाजेपर्यंत जेवढे मतदार मतदान केंद्राच्या परिसरात असतील त्या सर्वांना मतदान करू द्यावे. त्यामुळे पाच वाजता जी आम्ही आकडेवारी जाहीर करतो ती अंदाजित आकडेवारी असते. तसे आम्ही स्पष्ट म्हटलेले असते की, ही अंदाजित आकडेवारी आहे. त्यानंतर मतदान कधीकधी रात्री साडेआठ किंवा काही अडचणी आल्या तर दहा वाजेपर्यंतसुद्धा सुरू राहते. अशा वेळेस मतदानाची अचूक आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी किंवा जर मतदान केंद्र दुर्गम असतील तर तिसऱ्या दिवशीसुद्धा येऊ शकते. त्यामुळे उशिरा आलेली आकडेवारी ही काहीतरी गडबड करून आली आहे, असं समजणे योग्य नाही. आकडेवारी बाबत सर्व उमेदवारांना त्या-त्या वेळेस माहिती देण्यात येते. त्यामुळे आकडेवारीची माहिती ही प्रत्येक उमेदवाराकडेसुद्धा असते. त्यामुळे अशा पद्धतीने मतदानाची टक्केवारी वाढली आणि कोणाच्या बाजूने ती वाढवली गेली असं म्हणणे अयोग्य असल्याचे पारकर यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :
- अजित पवार म्हणूनच बाहेर पडले, देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासा, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल - Devendra Fadnavis On NCP
- शरद पवारांचं राजनाथ सिंहांशी काय बोलणं झालं ; प्रकाश आंबेडकरांचा सवाल - Prakash Ambedkar Slams Sharad Pawar
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 तासांसाठी बंद; नेमकं कारण काय? - Mumbai Airport Closed for 6 Hours