छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Water Level Indicator Patent : संशोधन केल्यावर पेटंट घेणं आजकाल प्रक्रियेचा भाग झालाय. मात्र, शहरातील एस बी ई एस सेंटीनरी स्कूल येथील आठवी वर्गात शिकणाऱ्या वैष्णवी कुरमुडेनं तयार केलेल्या वॉटर लेवल इंडिकेटर युनिटला पेटंट मिळालंय. अशा पद्धतीचे अनेक प्रोजेक्ट असित्वात आहेत. मात्र, वेगळ्या पद्धतीची मांडणी आणि त्यावर लावण्यात आलेले सेन्सर यामुळं त्यातील वेगळेपण दिसून येतं. तर पाणी बचतीचा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न केल्याचं वैष्णवीचे वडील धन्यकुमार कुरमुडे यांनी सांगितलं. तर वैष्णवीच्या या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक केलं जातंय.
पाणी बचतीसाठी तयार केले सेन्सर : मराठवाड्यात नेहमीच पाण्याचा दुष्काळ पडतो. त्यामुळं पाणी बचतीसाठी अनेक संस्था काम करत असतात. त्यात आता शाळकरी मुलं देखील पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळं वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी शाळेतच वेगवेगळे संशोधन केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एस बी ई एस सेंटेनरी स्कूल येथील आठवी वर्गात शिकणाऱ्या वैष्णवी कुरमुडे या विद्यार्थिनीनं एक यंत्र तयार केलंय. या यंत्रामुळं घरातील छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीतील पाणी वाया जाणार नाही अशी खबरदारी घेतली जाईल. जर हे यंत्र पाण्याच्या टाकीत लावलं तर पाणी पातळी जस जशी वाढेल, तसं बाहेर असलेल्या यंत्रातील लाईट लागण्यास सुरुवात होईल. तसंच टाकी भरली तर बजर देखील वाजेल.
वडिलांनी मिळवलं पेटंट : वैष्णवीनं आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. मुलीनं यंत्र तयार केल्यावर कुटुंबीयांनी तिचं कौतुक केलं. तसंच या संदर्भात बोलत असताना वैष्णवीचे वडील धन्यकुमार कुरमुडे म्हणाले की, "आजकाल पाण्याच्या टाकीत पाणी भरते मात्र लक्ष नसल्यानं ते वाया जाते. पाणी बचत करण्यासाठी महत्त्वाचं असलेलं हे यंत्र सर्वांना माहीत व्हावं, याकरिता प्रयत्न करण्यासाठी पेटंट करण्याचं आम्ही ठरवलं, आणि त्यानुसार आम्ही प्रयत्न केले. तसंच पेटंटही मिळवलं."
शाळेकडूनही कौतुक : एस बी ई एस सेंटीनरी स्कूलमध्ये वैष्णवीला पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आलं. हे यंत्र तयार करत असताना शाळेतील शिक्षकांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केलं. तसंच घरी आईनं देखील तिला मदत केली. वैष्णवीनं तयार केलेल्या यंत्राला पेटंट मिळाल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. तसंच यामुळं इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि ते देखील असे वेगवेगळे यंत्र तयार करू शकतात. त्याचा देशाला फायदा होईल, असं मत शाळेचे मुख्याध्यापक राहुल मोहनपूरकर यांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा -