नाशिक : दक्षिण भारतात फेंगल चक्रीवादळानं (Cyclone Fengal) थैमान घातलंय. याचा परिणाम राज्यात देखील बघायला मिळतोय. मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय. तर काही भागात पावसाचे देखील आगमन झालंय. नाशिक, बीड, निफाड, जालना या परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. परिणामी शेतकरी अडचणीत सापडलाय.
द्राक्ष मण्यांना तडे जाण्याचा धोका : नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी (5 डिसेंबर) रात्री जोरदार पाऊस झाला. यामुळं निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. फुलोरा अवस्थेतील द्राक्ष घडांची मणीगळ झाल्यानं मोठं नुकसान झालंय. तसंच परिपक्व होत असलेल्या द्राक्ष मण्यांना तडे जाण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळं निफाड तालुक्यातील उगाव, शिवडी, सोनेवाडी, हिंगलाजनगर भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. तसंच कांदा रोप आणि भाजीपाला देखील पावसामुळं खराब झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
कांद्याचं नुकसान : लासलगाव आणि बागलाण भागात देखील जोरदार पाऊस झाला. या पावसात लासलगाव बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला लाल कांदा आणि मका भिजल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. अनेक भागात ढगाळ वातावरणामुळं कांदा उत्पादक शेतकरी कांदा काढण्याच्या कामात आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी कांदा शेतात उघड्यावर ठेवल्यानं पावसामुळं कांद्याचं मोठं नुकसान झालंय. लाल कांद्यावर करपा रोगाचा धोका वाढला असून ढगाळ वातावरणामुळं कांदा उत्पादकांना फवारणीचा अतिरिक्त खर्च यामुळं करावा लागणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवस नाशिक जिल्ह्यातील काही ठराविक भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
हेही वाचा -