अमरावती Unique Tree Plantation : घरात कोणताही धार्मिक विधी करायचा असेल तर त्याअगोदर शक्य असतील तितकी झाडं लावावी, अशी अनोखी अट अमरावतीच्या पुजाऱ्यांनी ठेवलीय. सच्चिदानंद गिरी महाराज असं त्यांचं नाव आहे. ते अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्याच्या अगदी सीमेवर असणाऱ्या सोनोरी (बोपोरी) येथील रहिवासी आहेत. सच्चिदानंद गिरी महाराज हे मागील पाच वर्षांपासून प्रत्येक धार्मिक विधीपूर्वी जास्तीत-जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करतात.
प्रत्येक कार्यक्रमात वृक्ष लागवडीचा संदेश : व्याघ्र प्रकल्प अंतर्गत 2015 मध्ये मेळघाटातील जंगल संरक्षणासाठी खास वाघ संरक्षण दल स्थापन करण्यात आलं. या दलात सच्चिदानंद गिरी यांचादेखील समावेश होता. 2015 ते 2019 पर्यंत मेळघाटातील हरी सालच्या जंगलात वृक्षांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडं होती. या चार वर्षांत त्यांना वृक्षांच्या महत्त्वाची जाणीव झाली. त्यांनी 2019 नंतर वडील गणेश गिरी महाराज यांच्याप्रमाणे पूजा विधी आणि प्रवचनाच्या कार्यास सुरुवात केली. तेव्हापासून भजन, कीर्तन, प्रवचन अशा प्रत्येक कार्यक्रमात वृक्ष लागवडीचा संदेश देत असतात. तसंच धार्मिक सोहळा किंवा प्रवचनाचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी ते स्वत: रोपं घेऊन जातात.
आयोजकही करतात वृक्षांची व्यवस्था : लग्न सोहळ्याची आठवण म्हणून वृक्ष लागवड करावी, असं सच्चिदानंद गिरी महाराजांनी सुचवल्यावर अनेक जोडपी स्वतः विविध वृक्षाच्या रोपांची व्यवस्था करतात. अनेकदा लग्न सोहळ्यात 50 ते 100 तर कधी 200 वृक्षरोपण केले जाते. "वास्तुशांती दरम्यान गृहप्रवेशाची आठवण म्हणून अगदी घराजवळ वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घेतात. अनेकजण स्वत:च त्यांच्या आवडीच्या वृक्षाच्या रोपांची व्यवस्था करतात," असं सच्चिदानंद गिरी महाराज यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
दहाव, तेरवीच्या वृक्षारोपणाला मोठा प्रतिसाद : एखाद्याच्या घरात कुणाचा मृत्यू झाल्यावर त्या कुटुंबात त्या व्यक्तीच्या स्मृतीत वृक्ष लावण्याचा संकल्प करा, असं सच्चिदानंद गिरी सुचवतात. विशेष म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या स्मृतीत वृक्षारोपण करण्याच्या प्रस्तावाला चांगला प्रतिसाद मिळतो, असंही देखील गिरी महाराजांनी सांगितलं.
अनेक गावात वृक्षारोपण : सच्चिदानंद गिरी महाराजांचे वडील गणेश महाराज हे मूर्तिजापूर तालुक्यात वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत. वडिलांचेच कार्य पुढं नेत सच्चिदानंद गिरी यांनी अमरावती, मुर्तीजापूर, दर्यापूर आमतवाडा, कुरूम, बोहटा यासह भातकुली तालुक्यातील अनेक गावांमध्ये आयोजित कुठल्याही धार्मिक सोहळ्याच्या निमित्तानं नागरिकांकडून वृक्षारोपण करून घेतलं. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानं वृक्ष लावावीत, असा संदेश गिरी महाराज प्रत्येक कार्यक्रमातून देतात.
- गणेश उत्सव काळात राबवणार मोहीम : "गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या दोन्ही उत्सवांमध्ये सार्वजनिक मंडळांकडून वृक्षारोपण मोहीम राबवून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. मंडळांमध्ये माझ्याकडून गणपती स्थापना करून घेतली जाते. त्या सर्व मंडळाच्या वतीनं अगदी अधिकारानं मी वृक्षारोपण करून घेईल," असंही सच्चिदानंद गिरी महाराजांनी सांगितलं.
हेही वाचा -
- विद्यार्थी झाले सेलफोन मुक्त; शिक्षकाच्या प्रयत्नांना यश - Amravati News
- इमादशाही राजवटीत उभारला 'हौज कटोरा'; सव्वा पाचशे वर्षे जुन्या इमारतीवर इराणी शैलीची छाप - Houj Katora Amravati
- बादशहा अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक असणाऱ्या रत्नाची अचलपूरला समाधी; जयपुरवरुन दिवा लावण्यासाठी येतात पैसे - Raja Mansingh Amravati History