मुंबई Kalyan Lok Sabha Constituency : कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना महायुतीने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असा दावा करीत वैशाली दरेकर यांना ठाकरे यांनी उमेदवारी दिली. आता दरेकर यांना जिंकून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत असून विनोद घोसाळकर यांच्या समितीवर ही जबाबदारी सोपवली आहे.
उद्धव ठाकरेंची मोर्चेबांधणी जोरात : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण आणि ठाणे हे लोकसभा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचे केले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आटोकाट प्रयत्न केल्यानंतर शिंदे यांनी उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रयत्न चालवले आहेत. तर कल्याण लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली समिती: कल्याण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर सोपवली आहे. या मतदारसंघातील प्रश्न, समस्या आणि मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी 80 कार्यकर्त्यांची एक समिती नेमण्यात आली आहे. आपण या समितीचे प्रमुख असणार आहोत. या समितीच्या माध्यमातून प्रत्येक शाखे-शाखेत जाऊन नेमके कोणत्या मुद्द्यांना हात घातला पाहिजे आणि जनतेच्या भावना काय आहे, हे आम्ही जाणून घेणार आहोत आणि तसा अहवाल लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहोत, असे घोसाळकर यांनी सांगितले.
वैशाली दरेकरांना करणार किल्लेदार : कल्याणचा गड हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या मतदारसंघात शिवसेना पक्षाचा पारंपरिक मतदार आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मतदार अजूनही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वैशाली दरेकर यांना या मतदारसंघातून विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येणार असून त्यादृष्टीने रणनीती आखण्यासाठी आम्ही अभ्यास करणार आहोत. यामध्ये आमचे स्थानिक नगरसेवक शाखाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. त्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहोत आणि त्यानुसार पुढील रणनीती असणार आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा:
- 'मोदींमुळंच राम मंदिर झालं', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर स्तुतीसुमनं; उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच संपवली पत्रकार परिषद - Raj Thackeray
- माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील कुटुंबातीलच, कधी होणार मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश, खुद्द शरद पवारांनीच सांगितलं - Madha Lok Sabha Constituency
- 'एकनाथ शिंदे गट म्हणजे भाजपाची XXX'; संजय राऊतांची खालच्या भाषेत टीका - Sanjay Raut