नवी दिल्ली- शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी इलेक्टोरल बाँडवरून भाजपावर घणाघाती टीका केली. "भारत हा देशातील सर्वात मोठी भ्रष्ट पक्ष आहे. भाजपा म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी आहे. इलेक्टोरल बाँडमुळे भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी त्यांनी टीका केली. ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मोदी का परिवार' या प्रचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांना परिवाराचा अर्थ समजत नाही. परिवाराची कुणीतीरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री असताना "मी माझं कुटुंब, माझी जबाबदारी" ही माझी घोषणा होती. सध्या फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढंच तुमचं कुटुंब आहे, अशी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर जावे, त्यांचा खर्च करतो- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावकर चित्रपट पाहण्याची ऑफर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दिली. राहुल गांधी हे चित्रपट पाहणार असतील तर संपूर्ण चित्रपटगृह बुक करू, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच म्हटले. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, " देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर आणि लडाखमध्ये जावे. त्यांचा सर्व खर्च मी करतो. त्यांनी मणिपूर फाईल्स हा सिनेमा काढावा, असा टोलादेखील त्यांनी लगावला.
भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष - इलेक्टोरल बाँडवरून भाजपावर विरोधी पक्ष सातत्यानं निशाणा साधत आहेत. ठाकरे गटाचे अध्यक्षांनीही भाजपावर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपाकडं कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे इलेक्टोरल बाँडची माहिती झाकण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. भाजपा हा सर्वाधिक भ्रष्ट पक्ष म्हणून विकसित झाला आहे. भाजपामध्ये सगळे ठग गेल्यानं आम्ही ठगमुक्त झालो आहोत. भ्रष्टाचार हा भाजपाचा नैसर्गिक गुणधर्म आहे का? भाजपात गेलेल्या नेत्यांना क्लिनचिट मिळते. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या पक्षप्रवेश दिल्यावरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली. प्रफुल्ल पटेल यांच्यावर कुणी टीका केली होती? आदर्श घोटाळ्यावरून कुणी टीका केली होती? जनार्दन रेड्डी आणि नवीन जिंदाल यांच्यावर कुणी आरोप केले होते? अटलबिहारी वाजपेयींच्या काळात तत्वावरून चालणारी भाजपा वेगळी होती. सध्याची भाजपा हा केवळ भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?- पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, " भाजपाकडून चित्रविचित्र नेत्यांना सोबत घेतले जात आहेत. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. निवडणुकीच्या तोंडावर झारखडंचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. हुकूमशाहीविरोधात आमचा लढा आहे. भाजपानं महाराष्ट्रात गद्दारी करून सरकार स्थापन केले. सरकारविरोधात सर्वांच्या मनात संतप्त भावना आहेत, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
हेही वाचा-