नाशिक Uddhav Thackeray Nashik Sabha : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमावरून भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. राज्यव्यापी अधिवेशनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व रावण रामाचा मुखवटा घालून फिरत होते, अशी टीका ठाकरेंनी यावेळी केली. आपल्याला वालीचा वध करावा लागेल कारण त्यांनी आपली शिवसेना पळवली आहे. ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या हक्काची शिवसेना पळवली, त्यांचा आम्ही राजकीय वध केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवरुन टीका : शिवराय जन्माला आले नसते, तर राम मंदिर झालं नसतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अयोध्येला गेले आहेत. त्यापूर्वी कधीही ते अयोध्येला गेले नव्हते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामाचे मुखवटे घालून रावण फिरत होते. रामांबरोबर मोदींची तुलना करण्यात आली होती. शिवराय जन्मले म्हणून राम मंदिर शक्य झालं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
राजकीय वध करणार : शिवसेना पळवणाऱ्यांचा राजकीय वध केल्याशिवाय गप्प राहणार नाही. दिलेले वचन मोडणारे तुम्ही कसले रामभक्त? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एवढे दिवस मोदी अयोध्येबाबत का शांत होते? श्रीराम हे कुणा एका व्यक्तीचे किंवा पक्षाचे नाहीत. आतापर्यंत ज्यांची महाराष्ट्रावर नजर पडली, त्यांची मूठमाती झाली आहे हा इतिहास आहे, असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला.
हिंमत असेल तर मैदानात या : पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, 'अयोध्येचा आता इव्हेंट झाला. आता राम की नाही, काम की बात करा. मोदींनी १० वर्षात काय केलं? राम कुणाची एकाची मालमत्ता नाही. राजन साळवी, संजय राऊत अचानक तुम्हाला भ्रष्टाचारी वाटायला लागले. हिंमत असेल तर मैदानात या. भगव्याची प्रतारणा करणाऱ्या वालीचा आम्ही आता वध करणार आहोत. आमच्या प्रचारामुळेच तुम्हाला दिल्ली दिसली आहे. शिवसेना माझीच आहे. शिवसेना मला वडिलोपार्जीत मिळाली आहे. शिवसैनिक मला चोरून मिळाले नाहीत.'
तुमचा प्रचार करणारे गुन्हेगार कसे? : आता भाजपा ही इंग्रजाची तोडा-फोडा नीती वापरत आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. आम्ही निर्लज्ज भाजपावाले झालो नाहीत, तर काँग्रेससारखे कसे होणार? तसंच आता भाजपाचा बुरखा फाडावा लागेल. यापुढं महाराष्ट्र लढणार व देश जिंकणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. स्वातंत्र्य लढ्यात आरएसएसचा सहभाग नव्हता, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा-