मुंबई Assembly Monsoon Session 2024 : राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात सर्वाधिक संघर्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्यानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना दिसतात. दुसरीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीवर वारंवार प्रहार करत आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज विधान भवनात भारतीय जनता पार्टीचे नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते समोरासमोर आले. यावेळी त्यांच्यातील संवादाचे फटके ऐकायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे समोरासमोर : विधान भवनात आल्यानंतर विधान परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे उभे होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथं पोहोचले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही संवाद झाला. मात्र तिथं उभ्या असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचं टाळलं. मात्र दोघांनीही एकाच लिफ्टमधून विधान परिषद सभागृहापर्यंत सोबत प्रवास केला. यादरम्यान त्यांच्यात केवळ नमस्काराची देवाण-घेवाण झाल्याचं सांगण्यात येते.
राज्यातील जनतेला चॉकलेटच देणार - उद्धव ठाकरे : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अंबादास दानवे यांच्या दालनात उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट भेट दिले. तर अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटील यांना पेढा दिला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा भरवत आमदारकीच्या निवडणुकीबाबत शुभेच्छाही दिल्या. यावेळी ठाकरे आणि पाटील यांच्यात चर्चा झाली नाही, मात्र चॉकलेट स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाच. "राज्याचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार असल्यानं उद्या तुम्ही राज्यातील जनतेला सुद्धा चॉकलेटच देणार आहात," अशी कोपरखळी यावेळी उद्धव ठाकरे यांनी पाटील यांना लगावली.
हेही वाचा :
- नक्षल नेत्यानं 28 वर्षांच्या हिंसक प्रवासाला दिला पूर्णविराम; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्या आयुष्याची सुरुवात - Giridhar With Wife Surrender
- सायबर गुन्हेगारांनो सावधान! क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची चुटकीत होणार उकल, पोलीस करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis On Cyber Crime
- देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची सलामत, पण भाजपाला नंबर 1 सिद्ध करण्यासाठी मोठं आव्हान - Devendra Fadnavis