मुंबई - गुजरातचे दोन ठग म्हणजे मोदी-शाह हे महाराष्ट्र लुटायला चाललेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय. शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून मंगळवारी जागर लोकशाहीचा, जागर संविधानाचा आणि जागर महाराष्ट्र धर्माचा याबाबत राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. गुजरातचे दोन ठग म्हणजे मोदी-शाह हे महाराष्ट्र लुटायला चालले आहेत. पण यांना महाराष्ट्र काबीज करू द्यायचा नाही. विधानसभा निवडणुकीत यांना यांची जागा दाखवून द्यायची आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राऊत आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे यात विविध क्षेत्रांतील विविध समाजघटकांसाठी कार्यरत संविधानप्रेमी, लोकशाहीवादी विचारांच्या सर्व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विचारवंत, साहित्यिक, कलावंत हे सहभागी झालेत.
यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टर गुजराती: आताचं केंद्र सरकार हे लोकसभेत संविधान बदलायला निघालं होतं. ते किती म्हणो की आम्ही फेक नरेटिव्ह तयार केला होता, पण ते लोक संविधान बदलणार हे सत्य आहे. मराठी गुजराती असा वाद आधी कधीच नव्हता. पण दोन गुजराती ठग दिल्लीत बसलेत. त्यांना दिल्लीत बसून महाराष्ट्र काबीज करायचाय. महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे स्वतःच्या राज्यात पळवताहेत. मोठमोठे प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्याच मित्रांना म्हणजे अदानी आणि लोढा यांना दिले जाताहेत. त्यांनी घाईघाईने राम मंदिराचे उद्घाटन केले. पण यांना राम मंदिर बाधून राम काही पावला नाही. यांचे सगळे कॉन्टॅक्टर गुजराती आहेत आणि त्यांच्यासाठीच मोठमोठे प्रकल्प हे दोघेजण आणत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीकास्त्र डागलं.
राजकीय खांदा देण्याची गरज : पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येक राज्यात भूमिपुत्र यांना न्याय मिळाला पाहिजे. आमचा लढा हा देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही विरोधात आहे. जात, पात न बघणारे आमचे हिंदुत्व आहे. लोकसभा निवडणुकीच्यादरम्यान मी भाषणाची सुरुवात देशभक्त म्हणून केल्यानं यांच्या पोटात दुखू लागलं. नवीन महाराष्ट्र घडवण्याची गरज नाही, जे राज्यात सत्त्वं आहे ते टिकवण्याची गरज आहे. माझ्या महाराष्ट्रात काहीही कमी नाही. खांदा दोन अर्थांनी दिला जातो. आताही या दोन गुजराती नेत्यांना राजकीय खांदा देण्याची गरज आहे. लोकशाही नसती तर तुम्ही निवडून आला असता का? असा सवाल उद्धव ठाकरे उपस्थित केलाय. आमचं हिंदुत्व हे घरात आग लावणारे नाही, तर घरातील चूल पेटवणारे आमचे हिंदुत्व आहे. तसेच हे सरकार घालावं, असं माझं जनतेला आवाहन आहे. या सरकारला घालवण्यासाठी आपण गाफील राहता कामा नये. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांनी जागरूक असलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सत्ता यावी, यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय.
मुख्यमंत्री उमेदवाराला माझा पाठिंबा : मी काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासमोर सांगितले होते की, महाविकास आघाडीमधून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोणीही जाहीर करा. त्याला माझा जाहीर पाठिंबा असेल. आजही तेच सांगतो मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कोणी जाहीर करा, माझा पाठिंबा असेल. पण या नालायक आणि भ्रष्टाचारी राज्यातील सरकारला घालवण्याची माझी भूमिका आहे. गुजरातचे दोन ठग दिल्लीत बसून महाराष्ट्राच्या सुखात मिठाचा खडा टाकत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्हाला महाराष्ट्र सुखाने नांदतोय हे बघवत नाही का? यांनी निवडणुकीच्या आधी सबका साथ..., अशी घोषणा दिली होती आणि निवडून आल्यानंतर केवळ मित्राचा विकास असं सुरू झालंय, मोठमोठे उद्योगधंदे हे केवळ अदानी आणि लोढा यांना दिले जाताहेत. पण यांना सामान्य माणसाची व्यथा काही कळत नाही. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, म्हणून आता हे मोदी-शाह महाराष्ट्र लुटायला निघालेत. पण विधानसभा निवडणुकीत गाफील राहू नका आणि माझा महाराष्ट्र यांना लुटू देऊ नका, यासाठी विधानसभा निवडणुकीत सज्ज व्हा, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
गद्दारांना 50 खोके, लाडक्या बहिणीला 1500 रुपये : महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत चांगले काम करीत होते. कोरोना काळात सरकारने उत्तम कामगिरी बजावलीय. माझे आज या सरकारला आव्हान आहे की, तुमच्या सरकारमधील जे काम झालंय आणि आम्ही केलेली कामे यावर चर्चा करू यात. यात जर मी कमी पडलो तर तुम्हाला पुन्हा तोंड दाखवणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. आज हे महायुतीचे सरकार घोषणांचा पाऊस पाडत आहे, पण याची अंमलबजावणी किती होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमचे चांगले चाललेले सरकार गद्दारांनी पन्नास खोके घेऊन पाडले. पक्षातून गद्दारी केली. त्यावेळी 50 खोके घेतले आणि आता लाडक्या बहिणीला केवळ 1500 रुपये देतायत. त्याच गद्दारीतून आणि 50 खोक्यातून हे पैसे वाटले जाताहेत. पण हे काय स्वतःच्या खिशातले पैसे देत नाहीत, जनतेचे पैसे वाटत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि शिंदे गटावर केलीय.
जनतेनं पुढे आलं पाहिजे : आज आमच्यासमोर आग्रहनामा मांडला. विविध संस्था, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांनी सूचना केल्यात. पण मी म्हणतो आग्रहनामा कशाला? हा आमचा शिवसेनेचा वचननामा आहे. पण त्यापूर्वी माझी एक मागणी आहे. जे सध्या हे महाराष्ट्र धर्म बुडवायला चाललेत, महाराष्ट्र लुटायला चाललेत, ते थांबवण्यासाठी आधी तुम्ही मत द्या. जर तुम्ही मत दिलं तर आग्रहनाम्याची अंमलबजावणी करता येईल, यासाठी जनतेने पुढे येऊन मतदान केलं पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हणालेत. दरम्यान, माझं हिंदुत्व हे जात-पात आणि धर्म न मानणारे आणि इतरांना त्रास न देणारं आहे, असे ठाकरे म्हणालेत.
हेही वाचा -