छत्रपती संभाजीनगर Uddhav Thackeray : "आता कहर झालाय, कोण कोणासोबत आहे कळत नाही. कालपर्यंत अशोक चव्हाण सोबत होते. आता कळलं ते गेले. म्हणजे भाजपात गेले. नीट ऐकत जा, अशी मिश्किल प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. आतासुद्धा मराठवाड्यात दुष्काळ आहे, टँकर सुरू आहेत. अशोक चव्हाण गेल्यानं पाऊस पडणार आहे का? जसं अजित पवार बोलले तसं मी बोलणार नाही. एक दिवस काँग्रेसव्याप्त भाजपा होईल, इतकंच काय तर भाजपाचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेला असेल," अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केलीय. ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर असून, संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एकाच दिवशी वैजापूर, गंगापूर, कन्नड आणि शहरातील टीव्ही सेंटर भागात अशा चार सभा त्यांनी घेतल्या. या सभांमधून त्यांनी भाजपावर जोरदार टीका केलीय.
भाजपाचा अध्यक्ष काँग्रेसमधून आलेला व्यक्ती होईल : "आपल्या महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले आणि लाभतील. मात्र, सर्व जनता मला कुटुंबातील मानते हे माझं भाग्य आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या लढाईसाठी नाही उतरलो, मी तुमच्यासाठी लढाईत उतरलो असल्याचंही ठाकरे यावेळी म्हणाले. सध्या भाजपाची आणि आरएसएस कार्यकर्त्यांची खूप दया येते, 25 वर्षे आम्ही सोबत होतो. जिथे कमी तिथे आम्ही म्हणणाऱ्या भाजपामध्ये कार्यकर्त्यांची कमी का? नरेंद्र मोदी बोलले होते काँग्रेसमुक्त भारत. मात्र, एक दिवस असा येईल की भाजपाचा अध्यक्ष काँग्रेसमधून आलेली व्यक्ती होईल. आरएसएसला आता शंभर वर्षे होतील. एवढी वर्षे तुम्ही चिंतन, मंथन करत होता, काय मिळवलं? भ्रष्टाचाराचं पीक आलं," अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केलीय.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न : "चोराच्या हातात धनुष्यबाण दिलं, धनुष्यबाण रावणाला पेललं नाही, उताणं पडेल. याला काय पेलणार. हीच का लोकशाही, मला काही पाहिजे यासाठी लढत नाही. कदाचित कायद्यानं निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार असेल. मात्र, आमच्या बापानं दिलेलं नाव देणार नाही. तुमच्या निर्णयाला कचऱ्याच्या टोपलीत टाकतोय. महाराष्ट्रात आता गुंडागर्दी चालली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजलेत. असा फडतूस गृहमंत्री आहे," असा घणाघातही ठाकरे यांनी यावेळी केलाय. गोळीबार झाला, इकडे आक्रोश आणि टाहो हृदय पिळवून टाकणारा होता. मात्र, गृहमंत्री निर्लज्जपणे सांगतात कुत्रा गाडीखाली आला तरी राजीनामा मागतील. मात्र, एकही कुत्रा मत देणार नाही, कुत्रा इमानदार असतो, असा टोलाही ठाकरे यांनी लगावलाय.
आता हुकूमशाही गाडावी लागेल : गावगावांत रथ फिरत आहे 'मोदी सरकार'. त्यामुळं हे भारत सरकार आहे की मोदी सरकार? मोदी सरकार कोठून आलं? भारत सरकारची योजना मोदी सरकार म्हणून करणार का? जनता भोळी नाही. जेंव्हा शरद पवार केंद्रात कृषिमंत्री होते, तेंव्हा राज्यात शेतकऱ्यांसाठी रान पेटवलं होतं. शेतकऱ्यांकडं कोण बघणार? कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आम्ही हिंदू आहोतच, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मात्र, आम्ही भाजपा सोडलंय. ह्रुदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. राम मंदिर उभारलं याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, आता जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे ही हुकूमशाही गाडावीच लागेल, असा प्रहारही ठाकरे यांनी केलाय.
हेही वाच :
1 अशोकराव चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवारांसह काय म्हणाले काँग्रेसचे आमदार?
2 आजोबांना भारतरत्न मिळताच नातवाचा भाजपाप्रणीत एनडीएत प्रवेश; 'इंडिया' आघाडीला आणखी एक धक्का