मुंबई Uddhav Thackeray On BJP : केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत केव्हाही लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. तर, दुसरीकडं नेते देखील मतदार संघांमध्ये जाऊन सभा घेत लाआहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील जोगेश्वरी पूर्व इथं भेट दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. "भाजपावाल्यांना लग्नात बोलावू नका, येतील, जेवतील अन् नवरा बायकोचं भांडण लावतील," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
भारतीय जनता पार्टी आता भाडोत्री जनता पार्टी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या मुंबईतील विविध मतदार संघांना भेटी देत आहेत. शनिवारी त्यांनी जोगेश्वरी पूर्व इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जोगेश्वरी इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "भारतीय जनता पार्टी आता भाडोत्री जनता पार्टी बनली आहे. मी हे बोलण्यामागंच कारण म्हणजे, आज त्यांच्याकडं स्वतःचे नेते नाहीत. सर्व भाडोत्री बाहेरुन इतर पक्षातून आयात केलेले नेते आहेत. आता थोड्यादिवसापूर्वीच भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही यादी नीट पाहा. भाजपावाले ज्या कृपाशंकर सिंह यांना भ्रष्टाचारी म्हणत बोंबलत होते, त्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. पण, निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाही."
"भाजपावाले जातील तिथ भांडण लाऊन येतील" : पुढं बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपावाल्यांची एक वाईट सवय आहे. जिथं जातील तिथं भांडण लाऊन येतील. यांना तुमच्याकडं लग्नालाही बोलावू नका. आले तर बसल्या पंगतीला पातेलंभर तुपासोबत 35 पुरणपोळ्या खातील. आणि वरुन नवरा बायकोचं भांडण लाऊन निघून जातील. आपल्यातले काही गद्दार फोडल्यानं शिवसैनिक देखील आपल्याकडं येतील, असं भाजपाला वाटतंय. पण, निष्ठावंत म्हटल्यावर जसं तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आपल्या डोळ्यासमोर येतात, तसेच हे माझे शिवसैनिक आहेत. कितीही झालं तरी गद्दार ते गद्दारंच. ते का गेले माहिती नाही." असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
रवींद्र वायकरांच्या मनात नेमकं काय : मागील काही दिवस रवींद्र वायकर ईडीच्या रडारवर आहेत. रवींद्र वायकर देखील लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आज जोगेश्वरी इथं झालेल्या कार्यकर्ता जनसंवाद मेळाव्यात रवींद्र वायकर देखील उपस्थित असल्यानं वायकरांच्या मनात नेमकं काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात रवींद्र वायकर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :