गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव जवळ दोन दिवसात दोन मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (2 नोव्हेंबर) रोजी पेंडापूर, सारंगपूर जवळ चेहरा जळालेल्या अवस्थेत असलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला. रुग्णवाहिकेने हा मृतदेह गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
घातपात की अपघात? : ही घटना ताजी असतानाच आज रविवार (3 नोव्हेंबर) रोजी शिवना नदीच्या पाण्यात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. दोन दिवसात घडलेल्या या दोन घटनेमुळं गंगापूर पोलिसांसमोर तपासाचं आव्हान उभं राहिलं आहे. हा घातपात की, अपघात? याबाबत अद्यापही माहिती मिळाली नाही. गंगापूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
बालकानं केली आत्महत्या : या आधीही अशीच एक घटना घडली होती. लाडक्या कुत्र्याला आईनं मारल्यानं एका 14 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील मिलकॉर्नर भागात घडली होती. मृत मुलाचे वडील अंध आहेत, तर आई किराणा दुकान चालवून घर चालवत होती. एकुलत्या एका मुलानं टोकाचं पाऊल उचलल्यानं कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती दिली होती.
नेमकं काय घडलं : मिल कॉर्नर भागात राहणाऱ्या 14 वर्षीय मुलानं घरात कुत्रा पाळला होता. या कुत्र्याचा त्याला चांगलाच लळा लागला होता. कुत्र्यानं घरात घाण केली म्हणून मुलाच्या आईनं कुत्र्याला चापट मारली होती. तसंच यावरुन त्या आपल्या मुलावरही रागावल्या होत्या. त्याचवेळी मुलानं आईचा राग मनात धरून आत्महत्या केली होती. हा प्रकार त्याच्या आई आणि शेजारच्यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी तत्काळ मुलाला घाटी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून मुलाला मृत घोषित केलं होतं.
हेही वाचा -
- धक्कादायक! वडिलांसह 4 मुलींची आत्महत्या, दिल्लीतील रंगपुरी भागातील घटना - Father Suicide with 4 Daughters
- अखेर सहा दिवसांनी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन; स्थानिकांनी केला विरोध - Akshay Shinde Body Buried
- शीरासह धड वेगळे करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला सांगलीतून अटक, गुन्ह्याचं कारण धक्कादायक - Thane crime