नाशिक Nashik swine flu News : डेंग्यूपाठोपाठ नाशिक शहरामध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढलाय. स्वाइन फ्लूमुळं नाशिकमध्ये आणखी दोन जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या पाच महिन्यात नाशिकमध्ये 28 बाधित असून आतापर्यंत 8 जणांचा स्वाइन फ्लूने बळी घेतलाय. मात्र असं असलं तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं नाशिक महानगरपालिका वैद्यकीय विभागाचं म्हणणं आहे.
24 तासांत दोघांचा मूत्यू : मे महिना संपत नाही तोच नाशिक शहरामध्ये डेंग्यूनं डोकं वर काढलं असताना आता स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात स्वाईन फ्लूमुळं नाशिकमध्ये आणखी दोघांचा बळी गेलाय. मृतांमध्ये शहरांमधील 50 वर्षीय पुरुष तर 42 वर्ष महिलेचा समावेश आहे. गेल्या पाच महिन्यात स्वाइन फ्लूचे 28 बाधित रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत 8 जणांचा बळी घेतलाय. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये उद्भवणारे आजार यंदा उन्हाळ्याच्या कडाक्यामध्येच डोकं वर काढताना दिसून येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चालू महिन्यामध्ये तब्बल 33 डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयामधील बाधितांची संख्या अद्याप समोर आलेली नाही. त्यातच आता स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्यानं आरोग्य यंत्रणाची डोकेदुखी वाढलीय.
भर उन्हाळ्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव : सर्वसाधारणपणे तापमान वाढल्यास स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होत नसतो. त्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा कायम आहे. यंदाच्या मे महिन्यात तर उकाड्यानं सर्वांना हैरान केलंय. शहरात तापमानाचा पारा 42 अंशापर्यंत पोहोचलाय. मात्र त्यानंतरही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कायम आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात स्वाइन फ्लूचे 23 बाधित रुग्ण आढळून आले. मे महिन्यात परिस्थिती नियंत्रणामध्ये असताना अचानक गेल्या आठवड्यात नाशिकमधील जेलरोड भागातील 58 वर्षीय सेवानिवृत्त एअर फोर्स कर्मचाऱ्याचा स्वाइन फ्लूनं मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्यूनंतर रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तसंच दिंडोरीतील 42 वर्षीय महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाल्यानं तिच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. आतापर्यंत 28 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांना सांगितलय.
महानगरपालिका म्हणते परिस्थिती नियंत्रणात : नाशिक शहरात स्वाईन फ्लू नियंत्रणात असून घाबरण्यासारखं कारण नाही. कोणालाही स्वाइन फ्लूची लक्षणं आढळल्यास नागरिकांनी अंगावर न काढता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी केलं आहे.
डेंग्यूची रुग्ण संख्या 104 वर : नाशिक शहरात जानेवारी ते मे महिन्यापर्यंत डेंग्यूची रुग्ण संख्या 104 वर गेली असून आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांशी संपर्क साधावा असं महानगरपालिका मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. नितीन रावते यांनी सांगितलय.
स्वाइन फ्लूची लक्षणं : स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या लक्षणांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. यात ताप, सर्दी, थंडी, घसादुखी अंगदुखी, खोकला, पोटदुखी, उलटी, जुलाब, मळमळ अशा लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळं स्वाइन फ्लू टाळण्यासाठी वारंवार साबणानं स्वच्छ पाण्यानं हात धुवावे. आवळा, मोसंबी, संत्री तसंच हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करावा. पुरेशी झोप घ्या तसंच रुग्णांनी मास्कचा वापरावं असं आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागानं केलंय.
हेही वाचा
- केरळात मान्सून दाखल, मुंबई आणि महाराष्ट्रात कधी? वाचा काय म्हणाले हवामान तज्ञ - Monsoon Update
- पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सरकारकडून यंत्रणेचा दुरुपयोग; संजय राऊतांचा आरोप - pune hit and run accident
- सुनील टिंगरे यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे; पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून पाठराखण - Pune Porsche Accident
- मुलाचा 'कार'नामा! वडील, आजोबा अन् आता आई अटकेत; विशाल अग्रवालचा पोलीस पुन्हा घेणार ताबा - Pune Porsche accident case