नाशिक Vake Fata accident : रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला वाहनानं धडक दिल्यानं दोन महिलांसह एकाचा जागीच मृत्यू झालाय. राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव तालुक्यातील वाके फाट्याजवळ गुरुवारी हा अपघात झाला. मीनाक्षी अरुण हिरे (53, टिटवाळा, ठाणे), अनिशा विकास सावंत (40) तसंच विकास चिंतामण सावंत (45, ठाकुर्ली, जिल्हा ठाणे) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात वैभवी प्रवीण जाधव (17, रा. नाशिक) ही गंभीर जखमी झाली असून, तिला नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तीन जणांचा मृत्यू : मीनाक्षी तसंच अनिशा या दोघी बहिणी होत्या. मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी असलेल्या त्यांच्या वडिलांचं मुंबईत निधन झालंय. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी निमगाव येथे आणण्यात येत होतं. त्यामुळं जावई विकास सावंत हे त्यांच्या वाहनात जात होते. या वाहनात त्यांची पत्नी अनिशा, मेहुणी मीनाक्षीसह मेहुणीची मुलगी वैभवी नाशिक येथील होती.
कंटेनरला दिली धडक : गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील वाके फाट्याजवळ त्यांच्या वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, वाहनाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात वाहनातील विकास, अनिशा तसंच मीनाक्षी यांचा मृत्यू झाला असून वैभवी जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैभवीला तातडीनं मालेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर तिला नाशिकला हलवण्यात आलं. या अपघाताबाबत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.