पुणे Nikhil Wagle Car Attack : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी पुण्यात राष्ट्रसेवा दल येथे निखिल वागळे यांच्या कार्यक्रमाला जोरदार विरोध करण्यात आला होता. यानंतर निखिल वागळे हे कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना त्यांची ठिकठिकाणी गाडी फोडण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. गाडी तोडफोड प्रकरणात 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी जो गोंधळ झाला त्या प्रकरणी निखिल वागळे यांच्यासह महायुती तसेच महाविकास आघाडीच्या जवळपास 200 ते 250 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल : शुक्रवारी साने गुरुजी स्मारक येथे 'निर्भया बनो' सभा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार निखिल वागळे येणार होते. त्यांच्या पुण्यातील या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाकडून विरोध करण्यात आला. पुणे शहरातील काही रस्त्यांवर त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. जो निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याप्रकरणी पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशन येथे 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दिपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, बापु मानकर, स्वप्नील नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
दोनशे ते अडीचशे लोकांवर गुन्हा दाखल : दुसरा गुन्हा पर्वती पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा दुपारच्या सुमारास साने गुरुजी स्मारकाच्या बाहेर महायुती तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जे आंदोलन करण्यात आले त्या प्रकरणी करण्यात आला आहे. याप्रकरणी आयोजकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तब्बल दोनशे ते अडीचशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह अडीचशे जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
हेही वाचा -