अमरावती Application For Euthanasia : मेळघाटातील धारणी उपजिल्हा रुग्णालयात (Dharni Upazila Hospital) डॉक्टरांच्या हलगर्जीमुळं गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला. 22 दिवस झाले असताना देखील जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधित डॉक्टरांवर कुठलीच कारवाई केली नाही. यामुळं हताश झालेल्या मृत महिलेच्या पतीनं, जगायचं नाही, इच्छामरणाची (Euthanasia) परवानगी द्यावी, यासाठी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवलं आहे. भविष्यात मेळघाटात गरोदर माता आणि बालकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं आदिवासी पतीचं म्हणणं आहे.
पलंगाला रंग मारल्यानं फरशीवर झाली प्रसुती : धारणी तालुक्यात येणाऱ्या पाटीपाला या गावातील रहिवासी वंदना कासदेकर या गर्भवती महिलेला एक जून रोजी सायंकाळी सात वाजता प्रसुतीसाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी रुग्णालयातील पलंगांना रंग मारण्यात आल्यामुळं वंदना यांची प्रस्तुती चक्क फरशीवर करण्यात आली. प्रसूतीनंतर बराच रक्तस्त्राव झाल्यामुळं तिची प्रकृती अत्यंत खालावली. प्रसूतीनंतर काही वेळातच वंदना यांचा मृत्यू झाला आणि नवजात बाळ वडिलांकडं देण्यात आलं. थोड्या वेळांनी बाळ देखील दगावलं.
हिमोग्लोबिन होते कमी : वंदना कासदेकर या गर्भवती असल्याची नोंद हरीसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर माता म्हणून करण्यात आली होती. तिला कार्ड देखील देण्यात आले. तिच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी होते. मात्र, ते वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून काहीही केलं गेलं नाही. वंदना कासदेकर यांना प्रस्तुतीकळा यायला लागल्या असतानाच, 31 मे रोजी त्यांना हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिच्या अंगात हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं हरिसाल येथील डॉक्टरांनी रक्ताची व्यवस्था न करता तिला थेट धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला होता. धारणी उपजिल्हा रुग्णालयात पत्नीला घेऊन गेले असता डॉक्टरांनी दुपारी घरी पाठवलं. सायंकाळी तिला पुन्हा वेदना व्हायला लागल्यामुळं पुन्हा धारणीला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. यानंतर सायंकाळी सात वाजता तिची प्रसुती झाल्याची माहिती, पीडित पती दिलीप कासदेकर यांनी दिली.
पती बाळाचा मृतदेह घेऊन रात्रभर पावसात : आपल्या घरी बाळ होणार या आनंदात असणारा पती दिलीप यांना, पत्नीचा मृत्यू झाला आणि बाळही दगावलं हे ऐकून मोठा धक्का बसला. गंभीर बाब म्हणजे रुग्णालय प्रशासनानं पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्रभर शवविच्छेद केंद्रात ठेवला. तसंच बाळाचा मृतदेह मात्र दिलीप यांच्याकडं सोपवला. एक जून रोजी पीडित पतीनं बाळाचा मृतदेह घेऊन भर पावसात रुग्णालयाबाहेर रात्र काढली.
आरोग्य उपसंचालकांनी घेतली दखल : हे गंभीर प्रकरण समोर आल्यावर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्वात आधी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांच्या नेतृत्वात स्त्रीरोग चिकित्सक डॉक्टर अरुण सोळंके, अचलपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कांती शिलेदार यांची चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल शासनाला पाठवल्यावर विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी आरोग्य विभागाचे आयुक्त भंडारी यांना या प्रकरणाच्या चौकशी करण्याचे निर्देश दिले. 14 जून रोजी डॉक्टर भंडारी यांचं पथक धारणी तालुक्यात दाखल झालं. त्यांनी वंदना यांच्या पाठीपाला गावात जाऊन पती दिलीप कासदेकर यांच्याशी संवाद साधला. झाल्याप्रकाराबाबत ग्रामीण रुग्णालयातील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल डॉक्टर भंडारी यांनी 15 जूनला विभागीय आयुक्तांकडं सादर केला.
या गंभीर प्रकरणात केवळ चौकशी सुरू आहे. माझी पत्नी आणि बाळ दगावले. मेळघाटात घडणारा हा प्रकार अतिशय गंभीर आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी शासनाला जाग यावी म्हणून मी शासन आणि न्यायव्यवस्थेकडं इच्छामरणाची मागणी केली. - दिलीप कासदेकर पती
प्रशासन गप्प : या गंभीर घटनेसंदर्भात सध्या चौकशी सुरू असल्याचं सांगून प्रशासनातील अधिकारी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. चौकशी अहवालात नेमकं काय आहे, हे समोर आल्यावरच या प्रकरणात नेमकं कोण दोषी आहे. तसंच मेळघाटातील आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी नेमके काय प्रयत्न होणे अपेक्षित आहे हे स्पष्ट होईल.
हेही वाचा -