मुंबई Mumbai Fashion Street : देशाची आर्थिक राजधानी असलेलं 'मुंबई शहर' ही एक मोठी बाजारपेठ आहे. इथे तुम्हाला देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून खरेदीदार ‘फॅशन स्ट्रीट’ (Fashion Street) बाजारपेठेत आलेले दिसतील. या बाजारपेठेमधील असुविधांचा फटका विक्रेत्यांसोबतच नागरिकांनाही बसतो. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील सर्वच मार्केटचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळं अनेक सुविधा येथे उपलब्ध होणार असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलय.
'फॅशन स्ट्रीट' बाजारपेठेचा विकास : दादरचे फुलांचे मार्केट, अगर बाजार, सिटीलाईट, फॅशन स्ट्रीट इत्यादी मार्केटचा पुनर्विकास करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, या बाजारपेठांचा चेहरा मोहरा येत्या काही वर्षात बदलण्याचा कार्यक्रम राज्य सरकारच्या सहकार्यानं पालिकेनं हाती घेतलाय. यातील 'फॅशन स्ट्रीट' बाजारपेठेचा विकास आराखडा तयार झाला असून, लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.
सिंगापूरच्या धर्तीवर उभारण्यात येणार 'फॅशन स्ट्रीट' : याबाबत अधिक माहिती अशी की, 'फॅशन स्ट्रीट'च्या पुनर्विकासाचा आराखडा पालिकेकडून तयार करण्यात आला आहे. या पुनर्विकासासाठी पालिकेनं सल्लागारांची देखील नियुक्ती केलीय. सल्लागारांच्या अहवालाच्याआधारे हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं पालिकेनं म्हटलंय. सध्या मुंबईतील 'फॅशन स्ट्रीट' हा परिसर एका रांगेत असून, येथे व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गर्दी असते. मात्र, आता नव्यानं विकसित करण्यात येणारा हा परिसर युरोप आणि सिंगापूरच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे.
'फॅशन स्ट्रीट' नव्याने उभारली जाणार : युरोप, सिंगापूर या देशांमध्ये असलेल्या फॅशन स्ट्रीटवरील दुकाने समोरासमोर असतात. समोरासमोरील दोन दुकानांमध्ये ग्राहकांना येण्या-जाण्यासाठी अंतर असतं. याच धरतीवर मुंबईतील 'फॅशन स्ट्रीट' नव्याने उभारली जाणार आहे. यासाठी जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्याकडून नव्या दुकानांसाठी काही ठराविक रक्कम देखील आकारली जाणार आहे.
दुकानांचा आराखडा बदलण्यात येणार : 'फॅशन स्ट्रीट' या कपड्यांच्या बाजारपेठेचा आराखडा नेमका कसा असेल आणि या आराखड्यात काही बदल करावे लागतील का? या संकुलात खरेदीदारांना काय सुविधा देता येतील? याचा आराखडा तयार केला जात आहे. सल्लागारांकडून पालिकेला प्रेझेंटेशनही देण्यात आलं आहे. यात संबंधित सल्लागारांनी तीन पर्यायही दिले आहेत. त्यामुळं येथील दुकानांचा आराखडा बदलण्यात येणार आहे. या नव्या आराखड्यानुसार, दोन ते तीन दुकानांमध्ये काही अंतर राखलं जाईल. जुन्या प्लॅनमध्ये दुकाने काहीशी पुढच्या बाजूने वाढविण्यात आली असून नव्या प्लॅनमध्ये ती कशी मागे घेता येतील याकडं विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचं पालिकेनं म्हटलंय.
महिलांसाठी प्रसाधनगृहाची व्यवस्था : फॅशन स्ट्रीट येथील पदपथांची दुरवस्था आणि सुविधांचा अभाव यामुळं येथे येणाऱ्या ग्राहकांना नेहमीच विविध अडचणींचा सामना करावा लागतो. दुकानांच्या सुरक्षेबरोबरच महिलांसाठी प्रसाधनगृहाची व्यवस्था उभारणे हेही मोठं आव्हान आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये या मार्केटमध्ये आग लागली होती. त्यात 20 ते 22 दुकाने जळून मोठं नुकसान झालं होतं. भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यावर भर दिला जाणार आहे. परदेशाप्रमाणे संध्याकाळनंतर फूड ट्रकसारखी सेवा देण्याची 'फॅशन स्ट्रीट'ची योजना असल्याचं पालिकेनं म्हटलंय.
'फॅशन स्ट्रीट' हा मुंबईतील मोठा बाजार आहे. येथे ग्राहकांची खरेदीसाठी रोजच गर्दी होत असते. मात्र, सध्या 'फॅशन स्ट्रीट' येथे स्टॉल धारकांमध्ये सुसूत्रता नाही. त्याचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. इथल्या व्यापाऱ्यांना एकसारखे स्टॉल देण्यात येणार आहेत. येथे आग लागण्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडतात. त्याला प्रतिबंध व्हावा म्हणून ज्याला आग लागत नाही असे फायबरचे स्ट्रीट स्टॉल आम्ही 'फॅशन स्ट्रीट' येथील व्यापाऱ्यांना देण्याच्या विचारात आहोत. सध्या याची चाचणी सुरू आहे. - दीपक केसरकर, पालकमंत्री
ग्राहकांचा आणि व्यापाऱ्यांचा वनवास संपणार : या बाजारपेठांमध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. वर्षानुवर्ष मुंबईतील बाजारपेठांची ही दुरवस्था कायम आहे. अनेक भागांमध्ये अद्यावत सुविधांची वानवा आहे. त्यात वर्षानुवर्ष कोणतीही सुधारणा झालेली नाही. तसंच प्रशासन देखील याकडं दुर्लक्ष करत असल्याचं अनेकदा येथे व्यापारी सांगतात. त्यामुळं आता इथल्या ग्राहकांचा आणि व्यापाऱ्यांचा वर्षानुवर्षाचा प्रश्न आता सुटणार आहे. मुंबईतील सर्वच मार्केटचा चेहरा मोहरा बदलण्याचा विचार पालिका करत असल्यानं त्यानुसार टप्प्याटप्प्यानं हे काम करण्यात येणार आहे.
हेही वाचा -