सातारा Plane Accident : कराडच्या विमानतळावर (Karad Airport) प्रशिक्षण ॲकॅडमीचं फोर सीटर विमान कोसळून अपघात झाला आहे. त्यात प्रशिक्षणार्थी जखमी झाला आहे. सोलो ट्रेनिंग सुरु असताना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. पॉवर वाढल्यानं प्रशिक्षणार्थीला विमान कंट्रोल झालं नाही. त्यामुळं विमान कोसळलं. सुदैवानं विमानाने पेट घेतला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
सोलो ट्रेनिंगवेळी झाला अपघात : कराड येथील विमानतळावर मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या ॲम्बिसिअन्स फ्लाईंग क्लबनं आठ महिन्यांपूर्वी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे. २० प्रशिक्षणार्थीची पहिली बॅच याठिकाणी प्रशिक्षण घेत आहे. सध्या सोलो ट्रेनिंग (प्रशिक्षणार्थीनं एकट्यानं विमान चालवणं) सुरू आहे. प्रशिक्षण सुरू असताना फोर सीटर विमानाची पॉवर वाढली आणि विमान हवेत उडालं. त्यानंतर धावपट्टीवर संरक्षक भिंतीजवळ पलटी झालं.
गावापासून काही अंतरावर विमानाला अपघात : विमानतळाच्या दक्षिणेकडील संरक्षक भिंत ही वारुंजी गावालगत आहे. तेथून अगदी थोड्या अंतरावर विमानाचा अपघात झाला आहे. अपघातापूर्वी विमान हवेत हेलकावे खात होते. थोड्याच वेळानं विमान भिंतीच्या आतील बाजूला कोसळल्याचं वारूंजी गावातील लोक सांगत आहेत. या दुर्घटनेत प्रशिणार्थी जखमी झाला आहे.
मोबाईल, वीज वितरणच्या टॉवरमुळं लँडींगला अडथळा : कराडच्या विमानतळावर विमानाचं लँडींग धोकादायक बनलं आहे. विमानतळ परिसरात उंच इमारती, मोबाईल आणि वीज वितरण कंपनीचं टॉवर, दोन बाजूला डोंगर आहे. अशा धोकादायक परिस्थितीतही कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीकडून होत आहे. विमानतळ विस्तारवाढ ही आसपासच्या गावांसाठी धोक्याची आहे. भविष्यात याठिकाणी मोठ्या दुर्घटनेचा धोका संभवतो. हे प्रशासनानं लक्षात घ्यावं, अशी नागरीकांनी विनंती केलीय.
अजितदादांनी ओळखला विमान लँडींगचा धोका : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी कराड विमानतळावर लॅडींग करताना पायलटला धोका वाटला. त्यामुळं अजितदादांनी विमान थेट कोल्हापूरला नेण्याची सूचना केली होती. टॉवर, डोंगरांचा अडथळा अजितदादांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील विमानतळ विस्तारवाढ धोकादायक ठरू शकते, असं मत व्यक्त केल्याचं विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
मोठी दुर्घटना नाही, किरकोळ अपघात : यासंदर्भात माहिती घेण्यासाठी विमानतळ व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. ते रजेवर असल्याचं सांगण्यात आलं. बेस इन्चार्ज देखील परगावी आहेत. विमान प्रशिक्षण केंद्राच्या संबंधित सुत्रांनी यासंदर्भात माहिती दिली. प्रशिक्षणार्थीला विमान कंट्रोल न झाल्यामुळं धावपट्टीवरून खाली उतरलं. विमानाची चाके मातीत गेल्यामुळं जाम झाली आणि विमान पलटी झालं. ही मोठी दुर्घटना नाही. किरकोळ अपघात असल्याचा खुलासा त्यांनी केलाय.
हेही वाचा -