ठाणे Traffic on Mumbai Nashik highway : मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. तर, दुसरीकडं महामार्गावरील आसनगाव हद्दीत संथ गतीनं चालू असलेल्या रेल्वे ब्रिजच्या कामामुळंही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील चेरपोलीघाट, शहापूर, आसनगाव ते वशिंदपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून रात्रीपासून ही वाहतूक कोंडी झाली आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम : वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून 28 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित यंत्रणांना आदेश देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. मात्र, त्यांचे आदेश कागदावरच असल्याचं दिसून येत आहे. खड्ड्याच्या साम्राज्यामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच असल्याची चर्चा वाहन चालकांमध्ये आहे.
रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू : गेल्या 8 ते 10 वर्षापासून मुंबई नाशिक मार्गमार्गचे आठ पदरी रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळं नाशिक, ठाणे, मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यातच नाशिकवरून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेनं वाहनं चालवल्यानं दोन्ही लेन पूर्ण जाम झाल्या आहेत. विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या वाहनांना शहापूर पोलिसांनी आज सकाळपासून पुन्हा पाठीमागं फिरवले आहे.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश कागदावरच : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं मुंबई-नाशिक महामार्गाचं काम वेळेत पूर्ण व्हावं, या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असं निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 जुलै 2023 संबंधित यंत्रणांना दिले होते. तसंच मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या, रस्त्यांचं काम दर्जेदार करा, वाहतुकीचं नियमन करा, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. तसंच खड्डेमुक्तीसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स यापूर्वीच स्थापन करण्यात आला होता.
वाहतुक नियमनासाठी वॅार्डनसची नियुक्ती : या टास्क फोर्सनं नियमित बैठका घेऊन खड्डेमुक्तीच्या मोहिमेला गती द्यावी. वाहतुकीच्या नियंत्रण-नियमनाकडंही लक्ष द्यावे, असं निर्देशही मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत दिले होते. अवजड वाहनं, मालवाहतुकीच्या वाहनांसाठी वेळेचं नियोजन करा, हाईट बॅरियर लावा, महामार्गांच्या परिसरातील अतिक्रमण हटवा, वाहतुक नियमनासाठी वॅार्डनसची नियुक्ती करावी, हलकी वाहने, दुचाकींसाठी पाईप लाईन लगतच्या रस्त्याच्या कामाला गती देण्यात यावी, परिसरात सीसीटीव्ही लावण्यात यावे, असंही निर्देश मुख्यमंत्र्यांनी 28 जुलै 2023 संबंधित यंत्रणांना दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचे निर्देश कागदावरच असल्याचं वाहतूक कोंडीमुळं दिसून येत आहे.
'हे' वाचलंत का :
- पावसाळी अधिवेशन 2024 : राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू करणार : मुख्यमंत्री - Maharashtra Monsoon Session 2024
- राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असते तर...; काय म्हणाले संजय राऊत? - Sanjay Raut
- निंबूत गोळीबार प्रकरणातील जखमी रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू - Baramati Firing Case