चंद्रपूर Petrol Bomb Attack Ballarpur : मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच बल्लारपूरात पेट्रोल बॉम्ब फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील कापड व्यावसायिक अभिषेक मालू यांच्या कापड दुकानावर पेट्रोल बॉम्ब फेकल्यानं खळबळ उडाली आहे. यावेळी मालूच्या दुकानात काम करणारा कार्तिक साखरकर नावाचा नोकर गंभीर जखमी झाला. दरम्यान, पेट्रोल बॉम्ब घटनेचा व्यापारी संघटनेनं तीव्र शब्दात निषेध केला आहे.
नेमकं काय घडलं : बल्लारपूर शहरातील गांधी चौक परिसरात मोतीलाल मालू वस्त्र भांडार आहे. सकाळी हे दुकान सुरू झाल्यावर तिथं तीन अज्ञात इसमानी दुकानावर पेट्रोल बॉम्ब फेकला. त्यामुळं या दुकानात आग लागली. यात मालक अभिषेक मालू थोडक्यात बचावले. तर दुकानात काम करणारा कार्तिक साखरकर यात जखमी झाला.
यापूर्वीही झाला होता हल्ला : अभिषेक मालू यांचे लहान भाऊ यांच्यावर देखील काही दिवसांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी चाकूनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दुकान बंद होताच ते घरी निघाले, असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते लवकर घराजवळ पोचल्यानं थोडक्यात बचावले. याबाबत मालू कुटुंबानं पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसंच आमच्या कुटुंबाला जीवाचा धोका असून सुरक्षेची मागणी देखील केली होती.
दोन वर्षांपूर्वी वर्षी दुकान जाळलं : दोन वर्षांपूर्वी मालू वस्त्र भंडाराला आग लागली होती. यात कमालीचं नुकसान झालं होतं. ही आग नेमकी कशानं लागली हे कळलं नाही, त्याच हल्लेखोरांनी हे कृत्य केलं, असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
व्यापाऱ्यांनी केली बाजारपेठ बंद : ही घटना समोर येताच शहरातील व्यापाऱ्यांनी आपली बंद केली. आरोपींना अटक करा, अशी मागणी करत त्यांनी आज बाजारपेठ बंद ठेवली.
पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप : याबाबत व्यापारी संघटनेने पत्रकार परिषद घेत पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. मालू कुटुंबावर वारंवार जीवघेणे हल्ले होत आहेत. त्यांनी पोलीस सुरक्षा मागितली, मात्र पोलिसांनी याकडं दुर्लक्ष केलं. त्यांना सुरक्षा दिली नाही. विशेष म्हणजे यापूर्वी देखील असा हल्ला झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना नाही. अद्यापही आरोपी मोकाट फिरत आहेत. येत्या काही दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास संपूर्ण बल्लारपूर शहराची बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार, असल्याचा इशारा व्यापारी संघटनेनं दिला आहे.