सातारा Satara Road Accident : खड्डा चुकवताना पुण्यातील पर्यटकांची कार दोनशे फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्यानं मोठी खळबळ उडाली. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या सज्जनगड फाटा इथं शुक्रवारी बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. दोनशे फूट खोल दरीत कार कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली. मात्र सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दोनशे फूट खोल दरीत कोसळली कार : पुण्यातील पर्यटक गुरुवारी ठोसेघरला गेले होते. शुक्रवारी साताऱ्याकडं येताना सज्जनगड फाटा इथं खड्डा चुकवताना त्यांची कार दरीत कोसळली. हा अपघात काही तरुणांनी पाहिला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. नजीकच्या गावातील तरुणांनी जखमींना दरीतून वर काढलं. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रोडवरील खड्डा चुकवताना झाला अपघात : पुण्यातील पाच पर्यटक गुरुवारी ठोसेघर इथं फिरण्यासाठी आले होते. ठोसेघर इथं फिरल्यानंतर त्यांनी आज साताऱ्याकडं जाण्याचं ठरवंल. त्यामुळे ठोसेघरवरुन ते साताऱ्याकडं निघाले होते. यावेळी सज्जनगड फाटा इथं रोडवर असलेला भलामोठा खड्डा चुकवण्याच्या नादात कारच्या चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कारचा भीषण अपघात झाला. ही कार तब्बल दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या कारमध्ये बसलेले पाचही पर्यटक या अपघातात गंभीर जखमी झाले. कारचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर मोठा आरडाओरडा झाला. त्यामुळे शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ बचावकार्य केलं. यावेळी पोलिसांनाही तत्काळ माहिती देण्यात आली. त्यामुळे घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांनी अपघातात जखमी झालेल्या पर्यटकांना साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल केलं.
अपघातातील जखमी बाणेर, रहाटणी परिसरातील : कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात तेजस सचिन भोळे, कार चालक नाद अनिल पाटील, नेहा नाद पाटील, सिद्धार्थ भानुप्रकाश शर्मा, खुशबू घनश्याम शर्मा हे जखमी झाले आहेत. सर्वजण बाणेर आणि रहाटणी (जि. पुणे) येथील आहेत. जखमींची प्रकृती स्थिर आहे. अंबवडे (ता. सातारा) येथील नितीन देशमुख, निलेश देशमुख, सागर देशमुख, विजय झिमन, हवालदार संदीप कर्णे यांनी जखमींना दरीतून बाहेर काढलं. जखमींवर उपचार सुरू असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
हेही वाचा :
- सेल्फीच्या नादात तरुणी 100 फूट दरीत कोसळली, रेस्क्यू टीम ठरली देवदूत! - Satara Selfie Accident
- साताऱ्यात ट्रक-आशयर टेम्पोची समोरासमोर धडक; अपघातात दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी - Satara Accident News
- Satara Accident News : साताऱ्यातील व्यावसायिकाच्या विवाहित मुलीचा अमेरिकेतील भीषण अपघातात जागीच मृत्यू