शिर्डी Tigaon Village Story : संगमनेर तालुक्यातील तिगावचे (Tigaon) सरपंच ज्ञानदेव सानप आणि ग्रामसेवक सतीश गाडेकर या दोघा अवलियांनी लोकसहभागातून गावात साडेतीन हजार झाडे लावली आहेत. येथील हिरवीगार उद्याने सर्वाचं लक्ष वेधून घेतात. गावात जागा मिळेल तेथे फळझाडे लावण्यात आली आहेत. तीन हजार केशर आंब्यांची झाडे असलेली आमराई, हजारभर-कडूनिंबाची झाडे असलेले विष्णू उद्यान, नारळांच्या झाडांची दाटी असलेले कल्पवृक्ष उद्यान, तर जांभूळ अन चिंचेची दोन हजारांहून अधिक झाडे फोफावलेली दिसतात.
असं आहे 'पक्षी उद्यान' : विश्राम उद्यान हे सीताफळ अन शेवग्याची आहे. तर गावातील स्मशानभूमी देखील झाडांनी वेढलेली आहे. तिला 'पक्षी उद्यान' नाव दिलं आहे. येथे गर्द झाडीत दिवसभर पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. दशक्रिया विधीला कावळा शिवल्यावाचून खोळंबला असं तीन वर्षांत एकदाही घडलं नाही. प्रवचनकारासाठी सुबक सुंदर व्यासपीठ, पंगती बसण्यासाठी आकर्षक रंगसंगती असलेले पेव्हरब्लॉक, वैशिष्ट्यपूर्ण ओटे आणि अंत्यविधीसाठी प्रशस्त शेड आहे. येथील हे आगळेवेगळे पक्षी उद्यान खरोखरीच पाहण्यासारखे आहे.
भविष्यात आणखी झाडांची करणार लागवड : दोन हजार लोक संख्या असलेल्या तिगावात फोफावत असलेल्या जंगलातील झाडांची संख्या पंचवीस ते सत्तावीस हजार आहे. पुढील दोन तीन वर्षांत येथे मोठ्या प्रमाणावर केशर आंबा, चिंच, आवळा, जांभूळ, सीताफळ, लिंबू आणि चिंच या फळांचं उत्पादन सुरू होईल. ग्रामस्थांची गरज भागवून त्याची विक्री करता येईल. ग्रामपंचायतीला त्यातून मोठे उत्पन्न मिळायला सुरुवात होईल असं गावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप यांनी सांगितलं.
या आहेत गावात सुविधा : घर तेथे स्वच्छतागृह आणि शेजारी दोन शोष खड्डे प्लॅस्टिक पिंपाचा वापर करून तयार करण्यात आले आहेत. शोषखड्ड्यांचे वेगळे मॉडेल येथे पाहायला मिळते. जनावरांचे गोठे आणि मानवी वापराचे सांडपाणी कुठेही उघड्यावर न वाहता शोषखड्ड्यात जाते. तसेच घर तेथे परसबाग आहे. गाव कमालीचे स्वच्छ आहे, कुठे कागदाचा तुकडा नजरेस पडत नाही. प्लॅस्टिक कचरा वेगळा संकलित करून तो विकला जातो. दुचाकी आणि मोबाईलसाठी चार्जिंग स्टेशन आहेत. एक रुपया लिटर दराने शुध्द पाणी पुरवले जाते.
मियावाकी प्रकल्पाचा फायदा : राज्य सरकारनं 'माझी वसुंधरा अभियानात' या गावाला पन्नास लाखाचे पहिले बक्षीस बहाल केले आहे. मियावाकी हा वृक्षसंवर्धनाचा प्रकल्प येथील आणखी एक वैशिष्ट्य आहे. मियावाकी या वृक्षसंवर्धनाच्या पध्दतीत एक गुंठा क्षेत्रात तीनशे देशी वृक्षांची लागवड केली आहे. दाटीने झाडे लावली जात असल्यानं सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी ती जोमाने उंच झेपावतात. त्यांच्यातील ही जगण्याची स्पर्धा जंगल फोफावण्यास कारणीभूत ठरते. येथे अवघ्या तीन वर्षांत या प्रकल्पातील झाडे पंधरा ते वीस फूट उंचीची झाली आहेत.
या देशी वृक्षांची होणार लागवड : उंबर, वड, पिंपळ, चिंच, मोह, हिरडा, बेहडा, बिबा, जांभूळ, फणस, अर्जुन, बाभूळ, बेल, टेंभूर्णी, कुसुम, आपटा, पुत्रंजिवा, शमी, खैर, पारिजातक, कडीपत्ता, पळस, सीताफळ, डाळिंब, लिंबू, भोकर, पेरू, रामफळ, बहावा, सीताअशोक, सप्तपर्णी, नागकेशर, सोनचाफा, करंज, आवळा, सिसम, तामण, भेंड, काटेसावर आणि देवचाफा या देशी वृक्षांचा समावेश आहे. असे दहा प्रकल्प उभे करणार असल्याची माहिती, सरपंच ज्ञानेश्वर सानप यांनी दिलीय.
अशी केली पाण्याची सोय : इतकी झाडे जगविण्यासाठी पाणी आणायचे कोठून, यासाठी सरपंच सानप यांनी एका खासगी कंपनीकडून शेततळे तयार करण्यासाठी निधी मिळवला. गावातील जुन्या विहिरीचे पुनरूज्जीवन केले. खोदाई करून काँक्रीटचे कडे टाकले. पंधरा गुंठे क्षेत्रात तळे तयार केले. पावसाळ्यात विहिरीत येणारे पाणी तळ्यात साठवले. त्यातून छोट्या छोट्या पाईपलाईन मिळवून झाडे जगविण्यासाठी तीन कोटी लीटर साठवण क्षमतेचे तळे बांधले.
हिरवेगार आणि सुंदर गाव : पंचवीस ते तीस हजार झाडे तीन वर्षांची झालीत. देखभालीसाठी वीस पंचवीस मजूर असल्याने चांगली फोफावलीत. गाव हिरवेगार अन मोहक फुलांच्या ताटव्यामुळे सुंदर दिसू लागले. त्यामुळे दूर दूरचे लोक भेट द्यायला येतात. दिवसातले दहा-बारा तास संरपंचांसह ग्रामसेवक गावातच असतात. जंगल निर्मितीचा आनंद शब्दात सांगता येणार नाही असंही यावेळी सरपंच ज्ञानेश्वर सानप यांनी सांगितलं.
हेही वाचा -
Hivre Bazar : आदर्श गाव हिवरे बाजार येथे सुवर्णमहोत्सवी महाश्रमदानाचे आयोजन; पाहा व्हिडिओ