कोल्हापूर - बँकेत असणारी चांगल्या पगाराची नोकरी सोडून देऊन पर्यावरणासाठी जागृती करण्याच्या हेतूने तीन तरुण देशभर फिरत आहेत. 27 ऑक्टोबर 2022 पासून गेली पावणे दोन वर्षे ते ते तिघे देशभर शालेय मुलांसह देशवासीयांना पर्यावरण रक्षण किती गरजेचं आहे, याचे धडे कृतीतून देत आहेत. आतापर्यंत सुमारे अकरा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केलेल्या मूळच्या पश्चिम बंगालमधील तिघांनी आज कोल्हापूरला भेट दिली. तिघांपैकी संगीता विश्वास या महिलेचं धाडस पाहून कोल्हापूरकरही अचंबित झाले.
दररोज पर्यावरणाचा होणारा ऱ्हास डोळ्यासमोर पाहताना त्यांना असह्य वेदना होतात. आपणही पर्यावरणाच्या रक्षणासाठी काहीतरी केले पाहिजे, या हेतूने तिघांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला आणि खासगी बँकेतील नोकरी सोडून दिली. देशभर पर्यावरणाचं महत्त्व सांगत प्रबोधनाचं काम करणारे हे तरुण कोल्हापूरातील दोन दिवसांच्या पाहुणचारानंतर गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.
पश्चिम बंगालमधील चिंचोली हुबळी येथील प्रदीप विश्वास, संगीता विश्वास आणि अमित संगमा या तिघा पर्यावरण प्रेमींनी गो ग्रीन सेव अर्थ असा संदेश घेऊन आपला प्रवास सुरू केला. पर्यावरण आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी भारतभर भ्रमंती करून हा संदेश शालेय विद्यार्थी पर्यावरण प्रेमी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय त्यांनी मनी बाळगलं. यासाठी 27 ऑक्टोबर 2022 पासून भारत भ्रमंतीला प्रारंभ केला. त्यांनी तेव्हापासून आतापर्यंत देशातील पश्चिम बंगाल, ओडिसा छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा गुजरात, बिहार आणि आता महाराष्ट्र अशा 11 राज्यातून आतापर्यंत सुमारे साडेअकरा हजार किलोमीटरचा सायकलप्रवास या तिघांनी केला आहे. आज हे तिघे कोल्हापूरात दाखल झाले. कोल्हापुरातील पर्यावरण प्रेमींनी त्यांचं स्वागत केलं. दोन दिवसांच्या कोल्हापूर मुक्कामानंतर गोव्याच्या दिशेनं हे तिघे रवाना होणार आहेत. अजूनही उर्वरित राज्यांचा प्रवास करण्यासाठी अडीच वर्ष लागणार असल्याचं प्रदीप विश्वास यानं सांगितलं.
महिला सायकलवीर संगीता विश्वास यांच्या धाडसाचं कौतुक
पश्चिम बंगाल पासून निघालेल्या या तिघांमध्ये 27 वर्षीय संगीता विश्वास या महिला सायकलस्वाराचा समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत केलेला साडेअकरा हजार किलोमीटर प्रवासाचं अप्रूप कोल्हापूरकरांना वाटलं. अनेक महिलांनी आणि युवतींनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या धाडसाबद्दल कौतुक केलं. यावेळी बोलताना संगीता विश्वास यांनी भारतीयांना कोणतेही काम अशक्य नाही, फक्त मनामध्ये जिद्द असली पाहिजे, मी या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर मलाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. मात्र पर्यावरण रक्षण हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हा प्रवास केल्याचं, संगीता विश्वास यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.
शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे धडे
देशभर पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन सायकलवरून प्रवास करताना वाटेत येईल त्या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रदीप विश्वास, संगीता विश्वास आणि अमित संगमा यांनी प्रबोधनाचा प्रवास सुरु ठेवला. त्यांच्याकडे असलेल्या स्लाईड शोच्या माध्यमातून जगभरातील पर्यावरणाचा कसा ऱ्हास होत आहे, यासाठी शालेय विद्यार्थी म्हणून आपण काय केलं पाहिजे याविषयी सांगितलं. 'पर्यावरण वाचवा' ही संकल्पना शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावी यासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले. सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे नवीन राजवाडा बघायला आलेल्या मुलांना पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेश या तिघांनी दिला.
हेही वाचा -
- पृथ्वी वाचवा, आपलं भविष्य वाचवा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जंगल वाचवण्याचा संदेश - World Environment Day 2024
- मानवी हस्तक्षेपामुळे सुमारे 10 लाख प्राण्यासह वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर, जाणून घ्या आंतरराष्ट्रीय जैवविविधतेचं महत्त्व - biological diversity 2024
- मधमाशा केवळ आरोग्यासाठीच नाही तर निसर्गासाठीही आहेत उपयुक्त - World Bee Day 2024