अमरावती Upper Wardha Dam : अमरावती शहराची तहान भागवणारं अप्पर वर्धा धरण आता बऱ्यापैकी तुडुंब भरलं आहे. या धरणाच्या 13 पैकी तीन दारं आज उघडण्यात आली. मंगळवारी पहाटेपासूनच अप्पर वर्धा धरणाचं सुंदर रूप पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलीय.
मध्य प्रदेशातील मुसळधार पावसाने भरलं धरण : अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात मध्य प्रदेशातील नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा येतो. वर्धा नदीचं पाणलोट क्षेत्र हे मध्य प्रदेशात आहे. या पाणलोट क्षेत्रात केल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळं मध्य प्रदेशातील जाम आणि माडु नदीला आलेल्या पुरामुळं या नद्यांमधील पाणी अप्पर वर्धा धरणात आलं आहे. यासह पंधरा दिवसांपासून धरण परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढलाय. जुलै अखेरपर्यंत अप्पर वर्धा धरण 74 टक्क्यांपेक्षा रिकामं होतं. मात्र आता धरणातील पाणीसाठ्यात 79 टक्के एवढी वाढ झाली आहे. यामुळे धरणाची एक, सात आणि तेरी क्रमांकाची दारं उघडण्यात आली आहेत.
धरणाचा या परिसराला फायदा : अप्पर वर्धा धरणाद्वारे अमरावती शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत देखील अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा होतो. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे हे धरण आहे. येत्या काही दिवसात मध्य प्रदेशात आणि मुर्शी लगतच्या सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात आणखी पाऊस कोसळला तर अप्पर वर्धा धरण लवकरच इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या धरणाची तेराही दारं उघडली जाणार आहेत. दरम्यान वर्धा नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विभागातील प्रकल्पांची स्थिती : अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा या मोठ्या धरणासह शहानुर, चंद्रभागा, पूर्णा, सापन ,पंढरी, गदगा, बोर्डी नाला हे मध्यम प्रकल्प देखील तुडुंब भरले आहेत. अमरावती विभागात येणाऱ्या अमरावती, यवतमाळ अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 62. 34 टक्के पाणीसाठा आहे. यापैकी अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात 79.54 टक्के, पाणीसाठा असून यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात 99.99 टक्के, अरुणावती प्रकल्पात 53.67 टक्के, बेंबळा प्रकल्पात 50.11 टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात 84.28 टक्के, वान प्रकल्पात 50.60 टक्के, बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात 37.59 टक्के, पेनटाकळी प्रकल्पात 15.44 टक्के जलसाठा आहे.
हेही वाचा -
- साताऱ्याला सतर्कतेचा इशारा; पर्यटनस्थळं तात्पुरती बंद, कोयनेतून वाढणार विसर्ग - Weather Update In Satara
- कोल्हापूरकरांचं टेन्शन वाढलं! राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडले, पंचगंगेची पाणीपातळी वाढण्याची शक्यता - Kolhapur Radhanagri Dam
- डोळ्यादेखत भावंड नदीपात्रात बुडताना माऊलीनं दाखविलं प्रसंगावधान, नेसलेली साडी सोडून दोघांना वाचविलं! - Ahmednagar Floods News