मुंबई SWARASWAMINI ASHA - सात दशकांहून अधिक काळ आशा भोसले नावाची 'स्वराशा' गातेय. लता मंगेशकर नावाच्या संगीतातल्या हिमालयाची लहान बहीण म्हणून न जगता स्वतःच्या कर्तृत्वाचा हिमालय उभा करणाऱ्या आशा भोसले यांचा गायन प्रवास थक्क करणारा आहे. 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकात त्यांच्या याच अद्वितीय कारकिर्दीचा समर्पक आढावा घेण्यात आला आहे. पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आशा भोसले यांचा ह्रद्य सत्कारही करण्यात आला. त्यांचे धाकटे बंधू, विख्यात संगीत दिग्दर्शक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या बहिणीला कौतुकानं साडी भेट म्हणून दिली, तो प्रसंग भावुक करणारा होता. आपल्याला लहानाचा मोठं करण्यात आशाताईनं खूप कष्ट घेतल्याचं हृदयनाथ मंगेशकर यांनी आवर्जून सांगितलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी बोलताना बहीण आशा भोसले यांच्याबरोबरचे अनेक हृयस्पर्शी अनुभव सांगितले. "1942 सालच्या रखरखत्या दुपारी तापीच्या किनाऱ्यावर थाळनेरमध्ये मला कडेवर घेऊन आशा ताई फिरली आहे. लतादीदी, आशाताई उषा, मीना यांनी अनेक दिवस उपाशी राहून त्यांनी माझं संगोपन केलं. आशा मोठी गायिका झाल्या पण तिने मला ती गाते हे कधीही सांगितलं नव्हतं. जेव्हा तिचं गाणं ऐकलं तेव्हा मला धक्का बसला, कारण दीनानाथ मंगेशकरांसमोर आमची सर्व भावंडं गात होती. मात्र आशा भोसले यांना मी कधीच गाताना पाहिलं नव्हतं," अशी आठवण त्यांनी सांगितली.
आपल्या जडणघडणीमध्ये अनेकांचा आशीर्वाद आणि साथ मिळाल्याचं आशा भोसले यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितलं. त्या म्हणाल्या, "तुम्ही माहिलांनी मला प्लेबॅक सिंगर बनवलं. 'बाळा जोजो रे, पापणीच्या पंख्यात झोपू दे डोळ्यांची पाखरे, बाळा जोजो रे...' हे गाणं लोकप्रिय झाल्यानंतर हिंदीतूनही मला कामं मिळू लागले. अनेक संगीतकारांबरोबर मला काम करण्याची सधी मिळाली, त्यांच्या बरोबर मी गायिका बनत होते. सुधीर फडके यांच्या बरोबर गाताना सुरूवातीला त्रास झाला, मी त्यांच्याकडे पाहून विद्यार्थिनींसारखी शिकत असे. त्यानंतर यशवंत देव यांना गाणं शिकण्याची विनंती केली. त्यांनी मला सारेगम कसं गायचं हे शिकवलं." यावेळी आशा भोसले यांनी दिवंगत सुधीर फडके आणि यशवंत देव यांच्याकडे झालेल्या संगीतातल्या जडणघडणीचे किस्से सांगितले. आशा भोसले यांनी सादर केलेल्या सुधीर फडके आणि यशवंत देव यांच्या नकला उपस्थित रसिकप्रेक्षकांची दाद मिळवून गेल्या. मंगेशकर घराण्याची सावरकर भक्ती लपून राहिलेली नाही. आशा भोसले यांनी विनायक दामोदर सावरकर यांचा 'आपलं दैवत' असा उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "हृदयविषयी बोलायचं राहूनच गेलं, मी त्याला मोठं केलं. त्यानं मला एक गाणं त्याच्यासाठी गाणार का हे विचारलं. त्याच्यासाठी मी 'चांदणं शिंपीत जा' हे गाणं गायलं. त्यानंतर 'जीवलगा राहिलं रे दूर घर माझं' हे गाणं गायलं. त्याच्यानंतर 'केंव्हा तरी पहाटे', 'चांदण्यात फिरताना माझा घरलास तू हात', अशा अगाध गाण्याची रचना हृयनाथनं कशी बनवली याचं मला आश्चर्य वाटतं."
चित्रपटसृष्टीत आशा भोसले यांच्याबरोबर राजकारण झाल्याची चर्चा दर्दी संगीतरसिकांमध्ये कायम रंगत असते. याविषयी आशा भोसले यांनी "मला राजकारण कळत नाही. माझ्या आयुष्याच्या 80 वर्षांच्या कारकिर्दीत माझ्याविषयी किती राजकारण झालं हे मला अजूनही कळत नाही. पण या नव्या मुलांमुळं आता थोडं कळू लागलंय," असं सांगत आपल्याबरोबर राजकारण झाल्याचं सूचक वक्तव्यही केलं.
पार्श्वगायक सोनू निगमने या माऊलीचे पाय गुलाबजलाने धुतले. आशा भोसले यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी तीन पिढ्यांच्या गायक, कलावंतांसह, रसिकप्रेक्षकांच्या वतीने केलेली ही प्रातिनिधिक कृती ठरावी.
आशा भोसले यांच्यावरील पुस्तक हे सर्वोत्कृष्ट असले पाहिजे, याबद्दल आमचा कटाक्ष होता. आशा भोसले यांचं जीवन अतिशय खडतर होतं, त्यांचं जीवन बायोपिक बनवण्यायोग्य असल्याचं यावेळी आशिष शेलार म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येनं संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. राजदत्त, अशोक सराफ, निवेदिता सराफ, अनुराधा पौडवाल, सोनू निगम, सुदेश भोसले, देवकी पंडित, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, श्रीधर फडके, पद्मजा फेणाणी, पुनम धिल्लन, अशोक हांडे, राणी वर्मा, उत्तरा केळकर, सुधीर गाडगीळ, पुरुषोत्तम बेर्डे, वैशाली सामंत, नुतन आजगावकर, नितीन शंकर, डॉ. तात्याराव लहाने, मंगला खाडिलकर, प्रविण दवणे, श्रीकांत बोजेवार, पूजा सामंत, प्रशांत दांडेकर, जयश्री देसाई, अमरेंद्र धनेश्वर, प्रमोद घैसास, विजय दयाळ, पुष्कर श्रोत्री, सुनिल जयकर, मीना कर्णिक, रश्मी मुनशिंगीकर, अभिजीत गोखले, जयेंद्र साळगावकर, अमर कुलकर्णी अशा मान्यवरांना 'स्वरस्वामिनी आशा' हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
हेही वाचा -