मालेगाव : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मालेगावच्या सभेत राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केली. महायुती सरकार हरियाणातील विजयाच्या मार्गावर असल्याचं म्हणत असली तरी त्याचा काहीही उपयोग महाराष्ट्रात होणार नाही. राज्यात महाविकास आघाडीच्या सोबत समाजवादी पक्ष आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार कितीही प्रयत्न केला तरी राज्या येऊ शकणार नाही असं अखिलेश यादव म्हणाले. भर पावसात त्यांची येथे सभा झाली. तरीही लोक मोठ्या संख्येनं सभेला उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी सर्वांच्या उत्साहाचं कौतुक केलं. भारतीय जनता पार्टी हताश झालेली आहे. लोकसभेत त्यांची हार झाली. त्यामुळे या निवडणुकीत जिंकण्यासाठी ते सर्व पर्याय ते वापरत आहे. हरियाणात भाजपा हरता हरता जिंकली. असं असलं तरी महाराष्ट्रात महायुती हरणार म्हणजे हरणार असं स्पष्ट मत समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा खासदार अखिलेश यादव यांनी व्यक्त केलं मालेगाव आणि धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अखिलेश यादव यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत आपलं मत व्यक्त केलं.
महायुतीचं सरकार येणार नाही - यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, इंडिया आघाडीनं भाजपाला लोकसभेत तगडी लढत दिली. भाजपाने चारशे पारचा नारा दिला, मात्र ते बहुमतात सुद्धा आले नाहीत. अशाच पद्धतीने महायुतीचं सरकारही येणार नाही. महायुती सरकार म्हणजे महादुखी सरकार आहे, महाभ्रष्टाचारी सरकार आहे, असे यादव म्हणाले. महाराष्ट्रातील सरकार महायुतीचं हरणारं सरकार आहे त्यामुळे केंद्रातील सरकार देखील पडणार आहे. महाराष्ट्र सरकार हे यापूर्वी रोजगार देणारं सरकार होतं. आता सगळे बेरोजगार झालेत. समाजवादी पार्टी ही सगळ्यांचा विचार करणारी पार्टी आहे. मॉबलिंचींग, अन्यायाविरुध्द आम्ही लढा देणार आहोत. लोकसभेत बिल सादर केल्यावर आम्ही त्याला विरोध केला. मुस्लिमांना त्रास देण्यासाठी बिल आणलं जातं आहे. जमीन खरेदी पार्टी म्हणून भाजपाची ओळख आहे असं यादव म्हणाले. यावेळी विजांचा कडकडाट सुरू असताना यादव म्हणाले की, आमच्यासोबत ढगांचा आवाजही आहे. मालेगावमधून समाजवादी पार्टी निवडणूक लढवणार आहे. मालेगावचे लोक पावसाप्रमाणे आम्हाला भरभरून मते देतील आणि भाजपाला विरोध करतील. बुलडोझर, एन्काऊंटरच्या विरोधात उत्तर प्रदेशची जनता आहे. खोटे नरेटीव्ह पसरवण्याचं काम भाजपा करत आहे. यांना धडा शिकवलाच पाहिजे. यासाठी आपण इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान करा असं आवाहन अखिलेश यादव यांनी केलं.
शान ए हिंद यांना मालेगावातून उमेदवारी जाहीर : मालेगाव मध्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात समाजवादी पार्टी उतरणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं समाजवादी पक्षातर्फे शान ए हिंद निहाल अहमद यांना उमेदवारी जाहीर करत असून संपूर्ण मालेगाव मधील जनतेनं त्यांना भरघोस मतं देऊन निवडून आणावं असं आवाहन अखिलेश यादव यांनी केलं. तर याचवेळी त्यांनी रईस शेख यांना भिवंडीतून उमेदवारी जाहीर करत असल्याचं देखील सांगितलं.
हेही वाचा..