नागपूर : 30 वर्षांपूर्वी 40 महिलांनी एकत्रित येत 'बीसी ग्रुप' सुरू केला. त्यानंतर पैसे बचत करण्याच्या उद्देशानं या महिलांनी सोसायटी काढली. महिलांच्या या उपक्रमावर लोकांनी विश्वास दाखवल्यानं आज या सोसायटीचं रूपांतर 'मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी'त झालं. आज त्यांच्या सोसायटीची उलाढाल 2100 कोटी आहे, तर त्यांच्याकडं 1700 कोटी रुपयांच्या ठेवी सुरक्षित केल्या आहेत. 'दि धरमपेठ महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी' असं सोसायटीचं नाव असून महाराष्ट्रातच नाही, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही त्यांच्या शाखा आहेत. त्यामुळं ही सोसायटी आता मल्टी स्टेट झाली.
अडचणींवर मात करत नवा आदर्श निर्माण केला : सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सोसायटीचं रूपांतर बँकेत होणार आहे. महिलांनीही आर्थिक सक्षम व्हावं, या उद्देशानं 1994 मध्ये ही सोसायटी निलीमा बावणे यांनी सुरू केली. 30 वर्षांपूर्वी त्यांनी लावलेल्या या रोपट्याचं आज वटवृक्ष झाला असून, शेकडो महिलांना यातून रोजगार उपलब्ध झालाय. 30 वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रात महिलांचा वावर हा नगण्य होता. त्यामुळं या क्षेत्रात काम करताना अनेक संकटं आली. मात्र, निलीमा बावणे यांनी सर्व अडथळे पार करून एक नवा आदर्श निर्माण केलाय.
30 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला : निलीमा किशोर बावणे यांनी 1994 मध्ये म्हणजेच 30 वर्षांपूर्वी महिला सक्षमीकरणाशी संबंधित विचार डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेले प्रामाणिक प्रयत्न आज फळास आले. केवळ 50 रुपये गोळा करून सुरू झालेला हा प्रवास आज 2100 कोटींपर्यंत पोहोचलाय. सर्वसामान्य घरातील स्त्रिया काटकसरीनं थोडे थोडे पैसे बचत करतात. तांदळाच्या डब्यात तर कधी साखरेच्या डब्यात पैसे साठवून ठेवतात. त्यावर त्यांना व्याज मिळत नाही. हेच पैसे बँकेत ठेवल्यास महिलांना त्यावर व्याज मिळेल आणि अडचणीच्या काळात बँक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, हे प्रत्येक घरातील महिला व पुरुष सदस्यांना पटवून देण्यात निलीमा बावणे व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आलं. हळूहळू महिलांना निलीमा बावणे यांच्या सोसायटीवर विश्वास बसू लागला. त्यामुळंच आज 'दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह'चे सुमारे सव्वा लाख सभासद आहेत. निलीमा बावणे यांच्या अथक परिश्रमामुळं 30 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला.
'बीसी' ते 'मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी'चा थक्क करणारा प्रवास : निलीमा बावणे यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती. गरजूंना मदत करताना त्यांनी आपले हात कधीच मागे घेतले नाहीत. त्यावेळी 40 महिलांनी मिळून बीसी गट तयार केला. ठराविक रक्कम जमा करायची आणि ज्याला बीसीची गरज असेल त्याला ती रक्कम दिली जायची. मात्र, त्या पैशांची गरज असलेल्या महिलेला ते पैसे वेळेवर वापरता येत नसल्यानं निलीमा बावणे यांनी धाडसी निर्णय घेतला. बीसीमधील सर्व 40 महिलांना सोबत घेऊन त्यांनी पतसंस्था उघडण्याचा निर्णय घेतला. सर्व परवानग्या घेऊन अखेर 17 मे 1994 रोजी 'धरमपेठ महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी'ची स्थापना केली. आज ही पतसंस्था मल्टी स्टेट झाली असून, त्यांच्या राज्यभरात 38 शाखा आहेत.
महिलांचा विश्वास संपादन करणं महत्वाचं : "महिला खूप काटकसरी असतात. त्या स्वतःच्या पोटाला चिमटा काढतील पण बचत करतील. भविष्याचं नियोजन करणाऱ्या महिलांचा विश्वास संपादन करणं कठीण असलं तरी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांना महिलांनी भरभरून पाठिंबा दिला. आज अनेक महिलांनी पतसंस्थेच्या आर्थिक सहकार्यानं आपली स्वप्न पूर्ण केली आहेत," असं निलीमा बावणे सांगतात.
कुटुंबाची भक्कम साथ : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं नेहमीच म्हटलं जातं. पण निलीमा बावणे यांच्या यशामागं त्यांचे पती किशोर बावणे यांचा हात होता. आज त्यांच्या दोन्ही मुलीही त्यांना या कामात मदत करतात. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही मुलींना सामाजिक कार्यात रस आहे, असं त्या सांगतात.
हेही वाचा
- बँक मॅनेजरची नोकरी सोडून हाती घेतलं 'एसटी'चं स्टेअररिंग; प्रवासी काढतात सेल्फी, फोटो
- 'शितलादेवी'च्या दर्शनाला आल्यास साथरोग होतात बरे; भाविकांची गर्दी, जाणून घ्या आख्यायिका - Shri Shitladevi Mandir
- 'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज; ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये 'इतक्या' दिवसांत जमा होणार - Ladki Bahin Yojana