मुंबई Mumbai HC On Girl Abortion Case : मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी पुण्यातील 19 वर्षीय मुलीच्या 26 आठवड्यांच्या गर्भाच्या गर्भपाताला परवानगी दिली. प्रकरणाचे गांभीर्य बघून न्यायालयाने आपल्या दालनात मुलीशी आणि तिच्या पालकांशी संवाद साधला. यानंतर परवानगी दिली. मुलीतर्फे अॅड. तेजेश दांडे यांनी केंद्र सरकारतर्फे पूर्णिमा अवस्थी यांनी तर राज्यातर्फे अतिरिक्त सरकारी वकील कविता सोळुंके यांनी बाजू मांडली. बुधवारी या प्रकरणी निकाल राखून ठेवण्यात आला होता.
गर्भपातासाठी शिक्षणाचे दिले कारण : गर्भाला 25 आठवडे झाल्यानंतर 27 मे रोजी या प्रकरणी मुलीतर्फे याचिका दाखल करण्यात आली होती. गर्भवती असल्याचे समजल्यानंतर मोठा मानसिक धक्का बसल्याचे मुलीने याचिकेत नमूद केले होते. मुलीचे वय अवघे 19 वर्षे असल्याने तिला पुढील शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे याप्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाचा अहवाल मागवण्यात आला होता. याप्रकरणी तातडीने शक्य झाल्यास आजच गर्भपात करावा आणि अहवालात दिल्याप्रमाणे मुलीच्या मानसिक आरोग्याला धोका पोहोचण्याची भीती असल्याने आवश्यक ती काळजी घ्यावी असे निर्देश खंडपीठाने ससून रुग्णालयाला दिले आहेत.
काय आहे प्रकरण? : याचिकादार 19 वर्षीय मुलीचे 23 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून ती गर्भवती राहिली; मात्र तिला त्याची माहिती उशिराने समजली. तोपर्यंत गर्भाला 25 आठवडे पूर्ण झाले होते. त्यामुळे नियमाप्रमाणे परवानगी मागण्यासाठी मुलीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
हेही वाचा :