अहिल्यानगर : महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा मूलमंत्र दिला, मात्र झालं उलटंच. अपुऱ्या सोई- सुविधांमुळं खेड्यातून शहराकडे ओढा वाढला. शिकून सवरलेली मुलं आज पुण्या-मुंबईकडे वळत आहेत. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या गावानं 'द बाप कंपनी'च्या अभिनव प्रयोगानं गावातच संगणकीय उच्च शिक्षण घेऊन पाचशेवर मुलं गावातच थेट अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांना जागतिक दर्जाचं सॉफ्टवेअर विकसित करून देत आहेत. पुणे, बंगळुरू, हैद्राबाद या आयटी हबला 'द बाप कंपनी'ची संकल्पना एक प्रकारे आव्हान देत आहे.
गावातील मुलांना संगणक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण : निसर्गावर, पाऊस पाण्यावर अवलंबून असलेला आपला शेती व्यवसायाची अवस्था एकूणच शेतकऱ्यांसाठी निराशाजनक असल्यानं आज हजारोंच्या संख्येनं खेड्यातील कुटुंब शहराकडे धाव घेत आहेत. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या गावानं 'द बाप कंपनी'च्या सहाय्यानं अक्षरशः जगालाच गवसणी घातलीय. हे गाव ग्रामीण आयटी हब बनलं जात आहे. आज 'द बाप कंपनी'मध्ये गावातील व परिसरातील मुलांना संगणक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जातंय. लवकरच ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया पाठोपाठ लवकरच युरोपातील अनेक कंपन्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपिंगचे शेकडो कोटींचे व्यवहार हाताळणार आहेत.
शेतकरी मुलांच्या कौशल्यानं प्रभावित : व्होलफगँग प्लॅट्झ हे कथारो व्हेंचर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कथारो व्हेंचर्स ही एक व्हेंचर कॅपिटल फर्म आहे, जी नवीन व्यवसायांना निधी देते. 2001 मध्ये त्यांनी ट्रायसेंटीसची स्थापना केली, जी ट्रायसेंटीस टोस्काची मूळ कंपनी आहे. ट्रायसेंटीस टोस्का हे एक मॉडेल-आधारित ऑटोमेशन टेस्टिंग टूल आहे. संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या छोट्याशा गावातील 'द बाप कंपनी'ची माहिती व्होलफगँग प्लॅट्झ यांना मिळाली. कंपनीच्या पहिल्या भेटीत या शेतकरी मुलांनी आत्मसात केलेल्या कौशल्यानं प्रभावित होऊन, त्यांनी युरोपमध्ये गुंतवणूक केलेल्या अनेक कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आउटसोर्स करण्याचा प्रस्ताव 'द बाप कंपनी'ला दिलाय.
सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन : 'द बाप कंपनी'चे संस्थापक रावसाहेब घुगे आणि त्यांच्या तरुण टीमनं व्होलफगँग प्लॅट्झ यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. 'द बाप कंपनी'नं या प्रशिक्षार्थी विद्यार्थी यांच्याशी प्रश्नोत्तरांचं सत्र आयोजित केलं होतं, ज्यामध्ये व्होलफगँग प्लॅट्झ यांनी आयटी क्षेत्रातील करिअर संबंधित शंका दूर केल्या.
सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलांना नोकरीची संधी : लवकरच अमेरिका आणि ऑस्ट्रेलियानंतर 'द बाप कंपनी' युरोपीय प्रदेशासाठीही सॉफ्टवेअर बनवणार आहे. यासाठी पाच ते सात हजार प्रशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलांना नोकरीची संधी मिळणार आहे. कामांसाठी ग्रामीण भागातील प्रशिक्षित मुलांची कमतरता भासत आहे. मोठ्या शहरातच उच्च शिक्षणाची नोकरी मिळेल, या आशेनं शहराकडे धावणाऱ्या मुलांनी आपल्याच गावात कुटुंबासोबत राहून प्रशिक्षण घेवून सॉफ्टवेअर क्षेत्रातील गरज भागवावी, असं मत घुगे यांनी व्यक्त केलं. लवकरच श्रीरामपूर, सोलापूर आदी शहरातील ग्रामीण भागात 'द बाप कंपनी' आपल्या कामाचा विस्तार वाढवणार आहे.
हेही वाचा