ठाणे Thieves Arrest Case : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शिताफीने सापळा रचून अटक करण्यात कोळशेवाडी पोलिसांना यश आलं आहे. अटक केलेल्या या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल १२ लाख १० हजार रुपये किंमतीचे दागिने गस्तगत केले. खळबळजनक बाब म्हणजे, युपीच्या सराईत चोरट्यासह गुन्ह्यात सहभागी असलेले त्याचे वडील, भाऊ आणि वहिणी यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश राजभर आणि राहुल घाडगे अशी अटक दोन चोरट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी रचला सापळा : कल्याण पूर्व परिसरात लागोपाठ घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याण घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे, पोलीस अधिकारी दिनकर पगारे, पोलीस अधिकारी मदने, सुशील हांडे, सुरेश जाधव, सचिन कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. यावेळी गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा रचला.
पोलिसांना बघून चोरट्याने काढला पळ : उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी बस डेपोजवळ रचलेल्या सापळ्यात सराईत चोरटा राहुल घाडगे याला फिल्मी स्टाईलने पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांना बघून चोरटा राहुल गाडगे पळून जात होता; मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं. राहुल गाडगे विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यातच तब्बल पाच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले.
चोराला पकडण्यासाठी पोलिसांची वेषांतर : कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करण्यात सराईत असलेला चोरटा राजेश राजभर हा उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी लपून बसल्याची माहिती मिळाली. या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेश आजमगड येथील लालगंज परिसरात वेशांतर करून सापळा रचला आणि त्या ठिकाणाहून राजेश राजभर याला बेड्या ठोकल्या. कोळशेवाडी पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून चार गुन्ह्यांची उकल करत दहा लाखांचे दागिने हस्तगत केले. तपासा दरम्यान धक्कादायक बाब समोर आली.
राजेश विरुद्ध 30 घरफोडीचे गुन्हे दाखल : राजेश चोरी केलेले दागिने त्याच्या परिवारातील त्याचे वडील, भाऊ आणि वहिनी यांच्या मार्फत सराफांना विक्री करत होता. यातून मिळालेल्या पैशातून त्याचे कुटुंब उपजीविका करत होते. चोरटा राजेश राजभर विरोधात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वसई, विरार, मुंबई, पुणे येथील पोलीस ठाण्यात ३० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा: