ठाणे : भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात आगीचं सत्र सुरूच आहे. भिवंडी तालुक्यातील वळपाडा परिसरात असलेल्या ग्लोबल कॉम्प्लेक्समधील भंगारच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचं सांगितलं जातंय.
इंटीरियरचं शोरुम जळून खाक : मिळालेल्या माहितीनुसार, वळपाडा गावाच्या हद्दीत असलेल्या ग्लोबल कॉम्प्लेक्समध्ये शुभम इंटीरियर सॉल्यूशन कंपनी आणि काही भंगाराचे गोदाम आहेत. मध्यरात्री अचानक एका भंगारच्या गोदामाला आग लागली. त्यानंतर काही क्षणातच ही आग पसरली. त्या लगतचे आणखी दोन गोदाम तसंच शुभम इंटीरियर सॉल्यूशन कंपनीनं पेट घेतला. तसंच या आगीमुळं आसपासच्या परिसरातील घरांना देखील झळ पोहोचून नुकसान झालं. या भीषण आगीत भंगार गोदामासह इंटीरियर शोरुम जळून खाक झाले.
सुदैवानं जीवितहानी नाही : आगीची माहिती मिळताच खबरदारी म्हणून गोदामाशेजारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. त्यानंतर भिवंडी महापालिकेचे तीन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. तर सध्या घटनास्थळी कुलिंगचं काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी दिलीय. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचं सांगण्यात आलंय. या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
आगीचं सत्र सुरुच : भिवंडी तालुक्यातील वडपा खिंड कुकसे गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास कॉस्मेटिक तसंच प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झालं होतं. तर या घटनेची नोंद करण्यास कंपनीचे व्यवस्थापक आले नसल्यानं नेमकं किती नुकसान झालं? याची माहिती उपलब्ध नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी दिली. तर स्थानिक भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातही या आगीच्या घटनेची नोंद केली नसल्याचं पोलीस ठाण्यातून सांगण्यात आलं.
हेही वाचा -