ठाणे Thane Crime News : एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरासमोरच आरोपी तरुणानं गोंधळ घालत पीडित मुलीकडे बळजबरीनं लग्नाची मागणी करत, तू माझ्याशी लग्न कर नाही तर माझ्या जीवाचं बरेवाईट करेल अशी धमकी दिली. मात्र, पीडित मुलीनं लग्नास नकार देताच आरोपी तरुणानं धारदार शस्त्रानं स्वतःवरच वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानं पीडितेच्या नातेवाईकांनाही धमकावत बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना कल्याण पश्चिम भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील एका वस्तीत घडलीय. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात विकृत तरुणाविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केलीय. आवेश बाबू मोमीन असं अटक आरोपीचं नाव आहे.
नेमकं काय घडलं : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन 14 वर्षीय तरुणी ही कल्याण पश्चिम भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील एका वस्तीत कुटूंबासह राहते. तर आरोपी आवेश हाही त्याच भागात रहातो. त्यातच 11 मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास आरोपी पीडितेच्या घरासमोर जाऊन पीडित मुलीकडं लग्नाची मागणी करत तू माझ्याशी लग्न कर, नाही तर मी माझ्या जीवाचं बरंवाईट करेल, अशी धमकी दिली. यामुळं पीडितेची आई आणि तिचे नातेवाईक आरोपीशी बोलत असतानाच त्यानं खिशातून धारदार शस्त्र काढून स्वतःच्या मनगटांवर वार केले आणि रक्तभंबाळ अवस्थेत पीडितेच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली.
आरोपीला तीन दिवस न्यायालयीन कोठडी : दरम्यान, या घटनेची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या पीडित मुलीच्या नातेवाईकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर पीडितेच्या 35 वर्षीय आईंच्या तक्रारीवरुन आरोपी आवेशवर पोक्सोसह विविध कलमांन्वये बाजारपेठ पोलीस ठाण्यात 12 मे रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. आज आरोपीला विशेष न्यायालयात हजर केलं असता, त्याला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनवाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरजसिंग गौड यांनी दिलीय. या घटनेचा अधिक तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.
हेही वाचा :