ठाणे State Excise Department Raid : सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, असं असतानाच मालाड आणि मीरारोड येथील विदेशी नकली स्कॉच आणि महागडे मद्य बनवणाऱ्या एका कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकून तब्बल 27 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. 15 मार्च रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे. नरशी परबत बामनिया, भरत गणेश पटेल, दिलीप हरसुखलाल देसाई, विजय शंकर यादव, अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. तर या प्रकरणी पुढील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.
नेमकं काय घडलं? : एकीकडं लोकसभा निवडणुकींचं रणसंग्राम सुरू असतानाच, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी अवैध मद्य बनवण्याचं काम सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या क्यू विभागाला प्राप्त झाली. त्यानंतर प्राप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं जुहू तारा रोड, मालाड येथे एका रिक्षातून वाहतूक केली जाणारे विदेशी स्कॉच जप्त केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चौकशीदरम्यान हे मद्य बनावटी असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकास ताब्यात घेऊन, त्याची कसून चौकशी केली असता हे मद्य मिरा रोड येथे एका कारखान्यात बनत असल्याची माहिती समोर आली.
बनावट मद्य विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्काच्या पथकानं मिळालेल्या माहितीच्या आधारे शांती पार्क मीरा रोड येथील एका कारखान्यावर धाड टाकली. यावेळी या कारखान्यात विदेशी कंपन्यांचे बनावट मद्य निर्मिती होत असल्याचं निदर्शनास आलं. या कारखान्यामध्ये हे विदेशी बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणारे पॅकिंग साहित्य आणि रिकाम्या बाटल्या देखील आढळून आल्या. ऐन निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सतर्कतेमुळं या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
हेही वाचा -