ठाणे Thane Crime News : सोसायटीमधील पार्किंगच्या वादातून मानसिक तणावात येऊन एका रेल्वे होमगार्डनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तपासादरम्यान मृत होमगार्डच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. यावरुन कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भूषण लोटन मोरे (वय- 33) असं मृतकाचं नाव आहे. तर समीर देशमुख, सुभाष शेगर, दीपक शेलार, अनिल साळवी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पार्किंगवरुन वाद : मिळालेल्या माहितीनुसार, मृतक भूषण हा टिटवाळा पूर्वेकडील नांदप गावातील रवींद्र गॅलेक्सी नावाच्या सोसायटीत आई-वडील आणि भावासह राहत होता. तसंच गेल्या 12 वर्षांपासून तो होमगार्ड म्हणून मध्यरेल्वेत कार्यरत होता. मागील काही महिन्यांपासून वाहन पार्किंगवरून त्याचा सोसायटीतील रहिवाशांसोबत वाद सुरू होता. दिवसेंदिवस हा वाद वाढतच गेला. यावरुनच काही दिवसांपूर्वी भूषणनं सोसायटीच्या आवारात आपली दुचाकी पेटवली होती. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वादामुळं भूषण नेहमी मानसिक तणावात असायचा. अखेर 29 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यानं आत्महत्या केली.
गुन्हा दाखल : घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तपासादरम्यान त्यांना भूषणच्या खिशात सुसाईड नोट सापडली. याप्रकरणी भूषणचा मोठा भाऊ योगेश मोरे (वय 38) यांच्या तक्रारीवरुन कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम 306, 34 प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली आहे. चारही आरोपी सध्या फरार असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जावळे करीत आहेत.
हेही वाचा -
- रॅगिंगचा धक्कादायक प्रकार: नग्न करत मारहाण करून व्हिडिओ शूट केल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या, सहा जणांवर गुन्हा
- अश्लील फोटो पसरवण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल होताच आरोपीची आत्महत्या
- नाशिकच्या वरद नेरकरची दिल्ली आयआयटी दिल्लीच्या वसतीगृहात आत्महत्या, एम टेकच्या अंतिम वर्षाचा होता विद्यार्थी