ठाणे Married Woman Suicide Case : स्वयंपाक करता येत नाही, लग्नात मानपान केलं नाही असे टोमणे मारून २५ वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्यानं तिनं टोकाचं पाऊल उचलले. तिनं राहत्या घरात आत्महत्या केली आहे. ही घटना टिटवाळा भागातील हरिओम व्हॅली या इमारतीच्या एका रुममध्ये घडली आहे.
'ही' आहेत आरोपींची नावे : घटन प्रकरणी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या पाच नातेवाईकांवर भारतीय न्याय संहिता कलम ८०, ८५, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करून पाचही नातेवाईकांना अटक केली आहे. केतन दिनकर भांगरे (नवरा), दिनकर काशिनाथ भांगरे (सासरा), लतिका (सासू), गुंजन (दीर) आणि मनिषा (जाऊ) असं अटक केलेल्या नातेवाईकांची नावं आहेत. तर आरती दिनकर भांगरे (२५) असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे.
माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक आरती ही मूळची नाशिक जिल्ह्यात राहणारी होती. तिचा गेल्याच वर्षी २०२३ मध्ये आरोपी दिनकर याच्याशी विवाह झाला होता. त्यातच २१ मे २०२३ ते १० ऑगस्ट २०२४ पर्यंत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करणं सुरू झालं. नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यासाठी पाचही नातेवाईक आरोपींनी यासाठी तगादा लावला. त्यांच्या याच छळाला कंटाळून १० ऑगस्ट रोजी सासरी राहत असतानाच आरतीनं आत्महत्या केली.
आरोपींना पोलीस कोठडी : घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आरतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर मृतकचा भाऊ जनार्दन घारे (३२) यांच्या तक्रारीवरून मृत आरतीच्या पतीसह पाच नातेवाईकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अटकेतील पाचही आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आज ११ ऑगस्ट रोजी हजर केले असता १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ करीत आहेत.
आत्महत्या हा उपाय नाही- जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील अथवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर कोणीतरी नेहमी ऐकण्यासाठी उपलब्ध असते. तुम्ही स्नेहा फाउंडेशन - ०४४२४६४००५० (२४x७ उपलब्ध) किंवा iCall, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची हेल्पलाइन - ९१५२९८७८२१ वर कॉल करा. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत उपलब्ध आहे.
हेही वाचा :