ठाणे Gym Trainer Drowned In A River : वर्षा सहलीसाठी गेलेल्या एका जिम ट्रेनरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील शेणवे-खैरे गावाच्या हद्दीतील असलेल्या ओढ्याच्या परिसरात घडली. खळबळजनक बाब म्हणजे जोरदार प्रवाहात दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्यातील खडकाचा फटका बसल्यानं तरुण पाण्यात वाहून गेला होता. 24 तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवन रक्षक पथकांना त्याचा मृतदेह हाती लागला. याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विनायक वाझे (वय 29, रा. कल्याण ) असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विनायक हा कल्याण पश्चिम भागात कुटूंबासह राहत होता. तो आपल्या 10 ते 12 मित्रांसह वर्षा सहलीसाठी कल्याणहून शहापूर तालुक्यातील शेणवे-खैरे रस्त्यावरील केरला व्हिलेज याठिकाणी रविवारी (25 ऑगस्ट) गेला होता. त्यावेळी तो मित्रांसह खैरे गावाजवळील दुथडी भरून वाहत असलेल्या बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पोहोण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं तो वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच किन्हवली पोलीस आणि जीव रक्षक पथकांनी विनायकचा शोध सुरू केला. 24 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आज (26 ऑगस्ट) दुपारी विनायकचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
ओढ्यातील खडकाचा जोरदार फटका : दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने शहापूर तालुक्यातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. या ओढ्यात मोठे दगड आहेत. विनायकनं बंधाऱ्याच्या भिंतीवरून उडी मारताच, त्याला ओढ्यातील खडकाचा जोरदार फटका बसला. त्या फटक्यानं तो पाण्याखाली गेला. तो पुन्हा वर आलाच नाही. इतर तरुणांना तो डुबकी मारण्यासाठी गेला आहे, असं वाटलं. मात्र, बराच वेळ झाला तरी विनायक पाण्याबाहेर न आल्यानं सर्व घाबरले. ही माहिती तात्काळ स्थानिक गावकरी, किन्हवली पोलीस ठाण्याला देण्यात आली. जीवरक्षक दलाचे पथक तात्काळ दाखल झाले. त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. तो ओढ्यातील दगडांच्या कपारीत अडकला असण्याची किंवा वेगवान पाण्यामुळं सारंगपुरी नदी भागात वाहून गेला असण्याची शक्यता वाटत होती. मात्र, आज दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला.
हेही वाचा -
- सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला, ओढ्याच्या पाण्यात वृध्द गेला वाहून - Satara News
- साताऱ्यातील केळवली धबधब्यात पोहताना कराडचा तरूण बुडाला, रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू - Karad youth drowned
- फिरायला गेलेली महिला समुद्राच्या भरतीमुळे बुडाली, जीवाची बाजी लावून पोलिसांनी वाचविले प्राण - Mumbai Police news