मुंबई Neet Exam Fraud : एनटीएतर्फे घेण्यात आलेल्या नीट 2024 परीक्षेत एकाच परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांची नावे पूर्ण नाहीत तसेच अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज चुकूनही त्यांना कशी काय मंजुरी दिली गेली हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान ही परीक्षा अत्यंत संशयाच्या वातावरणात झाली असून यामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या परीक्षेत अनेक ठिकाणी पेपर फुटीचा प्रकारही झाला असून त्यामुळे ही परीक्षाच आता रद्द करावी, अशी मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही या परीक्षेबाबत आक्षेप नोंदवला असून याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. देशातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी अशा पद्धतीने खेळले जाणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात आता राज्यातील शिक्षक आणि पालक संघटनांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ही परीक्षाच रद्द करून सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
परीक्षाच रद्द करा - मोरे : नीट एक्झामचा जो धक्कादायक निकाल लागलेला आहे तो या प्रशासनावर प्रश्न उपस्थित करणारा आहे. नीट एक्झाम घेणाऱ्या व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारा आहे. 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले यामागे घोटाळा आहे की, सॉफ्टवेअरची गडबड आहे हे शोधावं लागेल; मात्र ही परीक्षाच रद्द करावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे नेते सुभाष मोरे यांनी केली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या मुलांवर जी परिस्थिती ओढवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी खरोखरच खूप मेहनत घेऊन मार्क मिळवलेली आहे, त्यांचं काय हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पैकीच्या पैकी गुण कसे मिळतात? ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत त्यांचे फॉर्म मंजूर कसे होतात? हे प्रश्न आज उपस्थित झालेले आहे. सर्वांत मोठा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की, पैकीच्या पैकी गुण मिळवणारे खरे विद्यार्थी कोण आणि खोटे विद्यार्थी कोण? हे कसं ठरवायचं? दुसरा प्रश्न असा की, पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांतून प्राधान्य कोणाला द्यायचे? असे अनेक प्रश्न या नीट परीक्षेतून निर्माण झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने नीट परीक्षा रद्द करून महाराष्ट्राने स्वतःची नीट परीक्षा घ्यावी, जेणेकरून महाराष्ट्रातील हुशार होतकरू मुलांना न्याय मिळेल, अशी मागणीसुद्धा मोरे यांनी केली.
सीबीआयमार्फत चौकशी करा- कराड : आताच नीट युजी 2024 ला जो काही निकाल जाहीर झालेला आहे, त्या निकालाबद्दल बऱ्याच काही शंका आहेत. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी गुरुकुल फाउंडेशनचे संचालक युवराज कराड यांनी केली आहे. ते पुढे म्हणतात, मी विद्यार्थी, पालक आणि माझ्या संस्थेबद्दल आम्हाला असं म्हणायचं आहे की, या परीक्षेला 720 मार्कांपैकी दिलेले ग्रेसमार्क जे आहेत ते कोणत्या परीक्षेच्या बेसिसवर दिले गेले? एनटीए कडून मागील वर्षांमध्ये 720 पैकी 720 मिळवणारे दोनच विद्यार्थी होते. यावर्षी तब्बल 67 विद्यार्थी 720 मार्क मिळवणारे आहेत. तसंच ग्रेस मार्किंगमध्ये नीटबद्दल सांगितल्याप्रमाणे क्लँट परीक्षेबरोबर तुलना करून नीटने ग्रेस मार्किंग दिलेली आहे.
प्रकरणाचा सीबीआय तपास व्हावा : युवराज कराड पुढे म्हणाले की, मुळातच क्लॅट ही परीक्षा ऑनलाईन असून नीट परीक्षा ऑफलाइन आहे. याची तुलना होऊ कशी शकते? तसेच नव्याने काय काय जाणवतंय ते एकाच सेंटरवरती सारखी रँक पण असलेले विद्यार्थी भरपूर सापडले, हे कसं शक्य आहे? बिहार, गुजरात, राजस्थान सारख्या ठिकाणीसुद्धा पेपर काही फुटलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा जाळण्याचे प्रयत्न झालेत. एकूण कार्यपद्धतीवरती संशय घेण्यासारखा विषय आहे. मी आणि विद्यार्थी पालकांमध्ये जो काही रोष आहे त्याबद्दल अत्यंत मनापासून तक्रार मला नोंदवायची आहे. याचा खरंच सीबीआयने तपास करावा आणि योग्य किंवा कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा. कारण 2015 मध्येसुद्धा न्यायालयानं सांगितलेलं आहे की, विद्यार्थ्यांपर्यंत योग्य तो निकाल जाऊ द्यावा, त्याच पद्धतीचा विचार करावा ही मागणी आहे, असंही कराड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
- महाबळेश्वरातील विशाल अग्रवालच्या हॉटेलवर प्रशासनानं फिरवला बुलडोझर, 15 खोल्या जमीनदोस्त - Vishal Agarwal
- कीर्तिकर यांच्या ऐवजी आम्हाला जागा मिळाली असती तर,...; कीर्तिकरांच्या पराभवावर काय म्हणाले नाना पटोले? - Congress Party
- हिंदी महासागराची तापमानवाढ - भारतातील किनारपट्टी समुद्राखाली जाण्याच्या उंबरठ्यावर तर नाही ना? - Warming of the Indian Ocean