नाशिक Tanvi Chavan Devare : शहरातील तन्वी ही दोन मुलांची आई असूनही तिने इंग्लिश खाडी पार करण्याचं कठीण आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीरित्या पूर्ण केलं. हे तन्वीच्या अदम्य इच्छाशक्तीचं आणि धैर्याचं प्रतीक आहे. अथक प्रशिक्षण आणि अडथळ्यांवर मात करत तिनं हे यश कमावलं. या यशामागे तन्वीचे तीन वर्षांचे कठोर परिश्रम आणि समर्पण आहे.
तन्वीनं घेतली ही मेहनत : नाशिकमध्ये तन्वीने दिवसाचे 8 ते 10 तास पोहण्याचा सराव केला. विविध हवामान परिस्थितीत तिनं स्वतःची चाचणी घेण्यासाठी भारतातील अनेक ठिकाणी जलतरणप्रवास केला. 29 जून रोजी सकाळी 8 वाजता तिने डोव्हर (यूके) मधून पोहण्यास सुरुवात केली. तिच्यासोबत तिचे प्रशिक्षक श्रीकांत विश्वनाथन आणि यूकेमधील क्रू मेंबर रेजिनाल्ड होते. प्रवासात अनेक अडथळे आले. तन्वीला अनेक जेलीफिशच्या डंखाचा सामना करावा लागला. तरीही ती 16 डिग्री सेल्सिअसच्या थंड पाण्यात पोहत राहिली. तीव्र समुद्राच्या भरती आणि प्रवाहांमुळे तिला जवळपास तीन तास अडकून राहावं लागलं. तथापि, बचाव बोट आणि टीमच्या प्रोत्साहनाने तिने हार न मानता पुढे पोहणे सुरू ठेवले. शेवटच्या तासांमध्ये खराब हवामानामुळे तीन सहकारी स्पर्धकांनी स्पर्धेतून माघार घेतली. तरीही तन्वीचा संकल्प आणखी दृढ झाला आणि तिनं अविश्वसनीय उत्साहानं पोहण्याचा टप्पा पूर्ण केला.
डोव्हरपासून विसांटपर्यंतचा प्रवास : डोव्हरपासून 32 किमीचा मार्ग तन्वीला पूर्ण करायचा होता; परंतु भरती-ओहोटी आणि तीव्र प्रवाहामुळे तिला विसांट येथे पोहोचण्यासाठी 10 किमीचा जादा मार्ग स्वीकारावा लागला. त्यामुळे तन्वीनं एकूण 42 किमी अंतर कोणत्याही विश्रांतीशिवाय पूर्ण केले.
तन्वी दोन मुलांची आई : इंग्लिश खाडी यशस्वीपणे पार करण्याचा निर्णय तन्वीने वयाच्या 33 व्या वर्षी आणि दोन मुलांची आई असताना घेतला, हे खूप विशेष आहे. ही खाडी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानं इंग्लिश चॅनल पूर्ण करणारी भारतातील पहिली आई होण्याचा मान तन्वीला मिळाला आहे. तन्वीच्या या विजयानं भारतातील अनेकांना प्रेरणा दिली आहे. तिनं हे सिद्ध केलं आहे की, जिद्द आणि कठोर परिश्रमानं कोणतेही आव्हान पार करता येते. तन्वीचा हा प्रवास महिला सशक्तीकरणाचे आणि धैर्याचे प्रतीक आहे, असं म्हणता येईल.
अनेक स्पर्धांमध्ये यश संपादित : तन्वीला वयाच्या 7 व्या वर्षांपासून स्विमिंगची आवड आहे आणि तिने अनेक पदकं जिंकली आहेत. आतापर्यंत शालेय आणि संघटनेच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं तिनं प्राप्त केली आहेत. शिवाय धरमतर्फे गेटवे ऑफ इंडिया (35 किलोमीटर), संकरॉक ते गेटवे ऑफ इंडिया (5 किलोमीटर) आणि इंडियन नेव्हीच्या नेव्ही डॉकयार्डमध्ये होणाऱ्या 6 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या जिंकलेल्या आहेत. तसेच मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या नदीतील 19 किलोमीटर स्पर्धा देखील जिंकलेली आहे. या अनुभवाच्या जोरावर तन्वीने इंग्लिश चॅनल पात्रता फेरी पार केली. इंग्लिश चॅनेल स्पर्धेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर तिने आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत मोठ्या जिद्दीने मुख्य कोच बेंगलोर येथील श्रीकांत विश्वनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. मुख्य कोच यांनी दिलेल्या स्विमिंग प्रोग्राम नुसार तिने काही दिवस बेंगलोर येथे आणि मग नाशिक येथे सेवानिवृत्त साई जलतरण प्रशिक्षक शंकर मालगुंडी यांच्या मार्गदर्शनाखाली रोज 7 ते 8 तास स्विमिंगचा सराव सुरू केला. तिचा आठवड्यातून एकदा 11 ते 15 तास स्विमिंगचा सराव सुरू आहे. प्रत्यक्ष तिला दिवस व रात्र यादरम्यान पोहावं लागणार असल्यानं सराव देखील दिवस व रात्र केला गेला.
हेही वाचा :