मुंबई - मुंबई उपनगरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत हे नेहमीच सरकारच्या विरोधात बोलत असतात, महायुती सरकारवर टीका करीत असतात. दरम्यान, संजय राऊत राहत असलेल्या भांडुप येथील मैत्री या बंगल्याची सकाळी साडेनऊ वाजता बाईकरून आलेल्या दोन अज्ञात इसमांकडून रेकी करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. या घटनेनंतर आमदार सुनील राऊत यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
...तर सरकार जबाबदार असेल : दरम्यान, सकाळी साडेनऊच्या दरम्यान बाईकवरून दोन अज्ञात व्यक्ती आल्या होत्या. त्यांनी आमच्या बंगल्याची मोबाईलद्वारे शूटिंग केली. यानंतर ते मागच्या गेटकडे गेले, तिकडे पण शूटिंग केली. आमच्या बंगल्याला दोन गेट आहेत. त्यामुळं त्यांनी शूटिंग केल्यामुळं काही तरी संशयास्पद कृत्य होतं. यानंतर आमच्या घरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज मी पोलिसांना सुपुर्द केलेत. पोलीस याची चौकशी करीत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईत भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळं एक भीतीचं आणि संशयास्पद वातावरण निर्माण झालंय. याच्या आधी आम्ही संजय राऊतसाहेब आणि मी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. पण सरकार सुरक्षा देत नाही. कदाचित आम्ही सरकारच्या विरोधात बोलत असल्यामुळं आम्हाला सुरक्षा मिळत नसेल किंवा त्यांना तसा दिल्लीवरून दबाव असेल. परंतु आमचे जर काही बरे वाईट झाले तर याला संपूर्ण सरकार जबाबदार असेल, असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी सरकारला दिलाय.
कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा : भांडुपमधील राऊत बंधूंच्या घरची रेकी केल्यानंतर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आलीय. माझ्या भांडुप आणि दिल्लीतील घराची रेकी करण्यात आलीय. तसेच सामना कार्यालयाची ही रेकी करण्यात आलीय. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. कधीही कुणाचाही खून होईल, अशी भीती आहे, अशी प्रतिक्रिया आपल्या घराची रेकी झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी दिलीय.
हेही वाचा :