सोलापूर Sushil Kumar Shinde News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी, स्वामीनाथन, पी. व्ही. नरसिंहराव, कर्पूरी ठाकूर, चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न जाहीर झाल्याची घोषणा करताच सर्वस्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्र सरकारच्या भारतरत्न पुरस्काराच्या घोषणेचं स्वागत करताना केंद्र सरकारला शाब्दिक टोलाही लगावला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे 'निर्भय बनो' सभेसाठी रविवारी हेरिटेज लॉन्स या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारतरत्न पुरस्काराविषयी मत मांडलं.
भारतरत्न पुरस्काराची मागणी: भारतरत्न पुरस्काराची मागणी अनेक जण करत आहेत. अण्णाभाऊ साठे, बाळासाहेब ठाकरे, सावरकर, फुले दाम्पत्य यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. मात्र अद्यापही त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला नाही. ज्यांनी ज्यांनी मागणी केलीय त्या सर्वांना भारतरत्न पुरस्कार देऊन टाका. म्हणजे कुणी शिल्लक राहणार नाही असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदेंनी केलं.
राज्य सरकारचा वचकच राहिला नाही: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातच भाजपा आमदारानं गोळीबार करत खून करण्याचा प्रयत्न केला. अशा घटना घडल्यानं राज्यात परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यावर सुशीलकुमार शिंदेंनी चिंता व्यक्त केली आहे. "सरकारचा वचकच राहिला नाही. या सर्व घटनांना वेळीच नियंत्रित केलं नाही. तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल. राज्यातील शांतता बिघडत चालली आहे. याची खबरदारी मुंबई पासून दिल्लीपर्यंत घेतली पाहिजे".
गल्लीबोळात चेंडू खेळणाऱ्या पोरांसारखी भाषा: "राज्यातील पक्ष आणि विपक्ष हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना खालच्या तळावर जाऊन भाष्य करत आहेत. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना मनोरुग्ण गृहमंत्री म्हटलं आहे. ही भाषा योग्य नव्हे. गल्ली बोळात चेंडू खेळताना जी भाषा वापरली जाते, त्या प्रकारची भाषा विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील मंत्री वापरत आहेत, असं सांगत सुशीलकुमार शिंदेंनी चिंता व्यक्त केली.
हेही वाचा: