पुणे Supriya Sule Phone And WhatsApp Working : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (11 ऑगस्ट) सकाळी आपलं व्हॉट्सॲप हॅक झाल्याची माहिती दिली होती. मात्र, आता त्यांचं व्हॉट्सॲप पुन्हा एकदा सुरू झालं आहे. याची माहिती त्यांनी आपल्या एक्स हँडलवरून दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, "माझे व्हॉट्सॲप सुरू झालं आहे. व्हॉट्सॲप टीमनं यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टीम व्हॉट्सॲप आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मनापासून आभार. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळं रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व."
माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलीसांचे मनापासून आभार. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व 🙏🏻
— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2024
नागरीकांना माझी…
आवश्यक ती काळजी घ्यावी : पुढं त्या म्हणाल्यात, "नागरिकांना माझी विनंती आहे की, आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही माझं व्हॉट्सॲप हॅक झालं होतं. कृपया आपण सर्वांनी डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्यावी. व्हॉट्सॲप वापरताना टू फॅक्टर व्हेरीफिकेशन करुन घ्या. आपले पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊ नये. तसंच अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या लिंक क्लिक करु नये. डिजिटल सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण आवश्यक ती काळजी घ्यावी", असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलंय.
नेमकं काय घडलं? : आज (10 ऑगस्ट) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला. त्या म्हणाल्या, “मला एक मेसेज आला होता. तो मेसेज काय आहे? ते पाहायला मी त्यावर क्लिक केलं. तेवढ्यात माझं व्हॉट्सॲप हॅक झालं. माझ्या असं लक्षात आलं की कोणीतरी माझा फोन ऑपरेट करतंय. याची खात्री करण्यासाठी मी जयंत पाटील यांना माझ्या व्हॉट्सॲपवर नमस्कारचा मेसेज करा, असं सांगितलं. त्यानंतर लगेच मी माझा फोन बंद केला. मात्र, माझा फोन बंद असूनही जयंत पाटील यांना त्यांनी केलेल्या मेसेजचा रिप्लाय आला. त्यानंतर लगेच यासंदर्भात मी पोलिसांकडं तक्रार केली."
हेही वाचा -