मुंबई Mumbai Railway Mega Block : विविध प्रकारच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मध्य आणि पश्चिम रेल्वे मेगा ब्लॉक (Mega Block) घेणार आहे. मध्य रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या मार्गिकेचे (ट्रॅक) ठाणे ते कल्याण दरम्यान, हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वेने बोरिवली ते राम मंदिर स्थानकांदरम्यान ब्लॉक जाहीर केलाय.
लोकलचं वेळापत्रक विस्कळीत : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मुसळधार पावसामुळं तीनही मार्गावरील गाड्या आधीच विलंबानं धावत आहेत. अशातच रेल्वेने तिन्ही मार्गांवर घेतलेल्या मेगाब्लॉकमुळं लोकलचं वेळापत्रकही विस्कळीत होणार आहे. त्यामुळं रविवारी मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करायचा झाल्यास मोठी कसरत करावी लागणार आहे. या ब्लॉक काळात ट्रॅकसह सिग्नलची देखभाल आणि दुरुस्ती केली जाणार आहे. या तांत्रिक कामांसाठी काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून मेल एक्सप्रेस गाड्याही 10 ते 15 मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती, रेल्वे प्रशासनानं दिली आहे.
असा असणार ब्लॉक : सुरुवातीला आपण मध्य रेल्वेच्या मेन लाईनबाबत माहिती घेऊ. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ठाणे ते कल्याण दरम्यान 5 आणि 6 व्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं अप जलद मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळं डाऊन मेल गाड्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान धीम्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. याचा परिणाम म्हणजे अप आणि डाऊन एक्सप्रेस गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.
11 ते 4 वाजेपर्यंत असणार ब्लॉक : हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल-बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन लोकल या कालावधीत बंद राहतील. सीएसएमटी-वाशी, ठाणे ते वाशी/नेरुळ, बेलापूर-नेरूळ आणि उरण दरम्यान लोकल सेवा सुरू राहील. सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 पर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे सुटणारी अप हार्बर लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दुपारी 3:13 या वेळेत पनवेल-बेलापूरला जाणारी डाउन हार्बर लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.
बोरिवली ते राम मंदिर स्थानकापर्यंत मेगाब्लॉक : पनवेल ते ठाणे अप ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 पर्यंत आणि ठाणे ते पनवेल डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत लोकल सेवा रद्द राहतील. पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा विचार केल्यास, मेमू क्रमांक 01339 वसई रोड-दिवा गाडी सकाळी 9:50 वाजता सुटेल. ही गाडी वसई रोड ते कोपरपर्यंत धावणार आहे. कोपर ते दिवा स्थानकांदरम्यानची सेवा रद्द राहणार आहे. बोरिवली ते राम मंदिर स्थानकापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
हेही वाचा -
- मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा! - Mumbai Mega Block
- मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक संपला; तीन दिवसांच्या ब्लॉकमधून प्रवाशांना काय मिळालं? - Central Railway Block Ends
- मुंबईला जाताय तर थांबा! 'ही' बातमी न वाचता मुंबईला जाण्याचं नियोजन केल्यास होऊ शकते अडचण - Mega Block