मुंबई Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिव म्हणून आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची अखेर नियुक्ती करण्यात आलीय. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच एका महिलेला मुख्य सचिव पदाचा बहुमान मिळाला आहे. यापूर्वी गृहसचिव या पदावर असलेल्या चंद्रा अय्यंगार, चित्कला झुत्शी, मेधा गाडगीळ या तीनही महिला आयएएस अधिकारी सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्य सचिव पदाच्या दावेदार होत्या. पण त्यांना संधी मिळू शकली नव्हती.
डॉ. नितीन करीर यांची रविवारी निवृत्ती : लोकसभा निवडणुकीमुळं मुदतवाढ देण्यात आलेले माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे रविवारी निवृत्त होत आहेत. नितीन करीर हे 31 मार्च रोजी निवृत्त होणार होते. 31 डिसेंबर 2023 रोजी त्यांची या पदावर तीन महिन्यांसाठी नियुक्ती झाली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं नितीन करीर यांच्या मुतदवाढीचा प्रस्ताव दिलेला नव्हता.
डॉ. करीर यांची मुदत संपली : राज्य सरकारनं सुरुवातीला मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला. आयोगानं हा प्रस्ताव फेटाळून 3 अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्याचे निर्देश दिले. त्यामुळं सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांची शिफारस करण्यात आली. पण, निवडणूक आयोगानं ही शिफारस विचारात न घेता डॉ. करीर यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यांना दिलेली मुदतवाढ 30 जून रोजी संपुष्टात आली.
कोण होते शर्यतीत? : राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत सेवा ज्येष्ठतेनुसार 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या सुजाता सौनिक, त्यानंतर 1988च्या बॅचचे अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विभाग, राजेश कुमार मीना आणि 1989 च्या बॅचचे मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबालसिंह चहल हे अधिकारी मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत होते. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक सध्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आहेत.
कोण आहेत सुजाता सौनिक? : सुजाता सौनिक यांनी आपलं शैक्षणिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण चंदिगडमध्ये पूर्ण केलं आहे. त्यांनी इतिहास विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून पदवी घेतली. आपल्या 37 वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत सामान्य प्रशासन विभाग तसेच कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केलं. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह विभाग, राज्य सरकारच्या सल्लागार तसेच सहसचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
मुख्य सचिवपद भूषवणारे पहिले दाम्पत्य? : सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव झाल्यामुळं नाव इतिहास घडला आहे. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत राज्याचे मुख्य सचिव होते. निवृत्तीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यामुळं राज्याचे मुख्य सचिवपद भूषविणारे सौनिक हे देशातील पहिले दाम्पत्य ठरले आहे. सुजाता सौनिक मुख्य सचिवपदावरुन जून 2025 अखेरीस निवृत्त होणार असल्यानं त्यांना सुमारे सव्वा वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे.
हेही वाचा -
- मुंबईत आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाईट नोट - IAS officer daughter suicide
- संसदेतून एखाद्या सदस्याची हकालपट्टी कधी होऊ शकते? अशी प्रकरणं यापूर्वी कधी समोर आली? जाणून घ्या
- Skill development case : ३७१ कोटींचं स्किल डेव्हलपमेंट प्रकरण आहे तरी काय, चंद्राबाबू नायडूंना या प्रकरणी झालीय अटक