नंदुरबार - नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहात विद्यार्थिंनींना जेवणानंतर मळमळ तसंच उलट्या होऊ लागल्या. ही बाब अधीक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना दिसून आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याबाबत कळवले. त्यानंतर विद्यार्थिनींना तत्काळ विसरवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. जवळपास 21 विद्यार्थिनींना त्रास होऊ लागला होता. त्यापैकी एका विद्यार्थिनीला जास्त त्रास होत असल्यामुळं तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल. सदर विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनींच्या पालकांना माहिती मिळताच त्यांनी विसरवाडी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सर्व विद्यार्थिनींची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. तर मुलींना देण्यात आलेल्या जेवणाचं सॅम्पल पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
जेवणानंतर विद्यार्थिनींना जाणवला त्रास - नंदुरबार आदिवासी विकास विभाग प्रकल्प अंतर्गत नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना दुपारचं जेवण केल्यानंतर अचानक मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. जवळपास 71 मुलींनी जेवण केलं होतं. त्यापैकी 21 मुलींना जास्त त्रास जाणू लागला. वसतीगृहाच्या अधीक्षकांनी तत्काळ विद्यार्थिनींना विसरवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. एका विद्यार्थिनीला जास्त त्रास होत असल्यामुळे तिला नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. याठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या वसतीगृहात आठवी ते बारावीच्या जवळपास सत्तरहून अधिक मुली वास्तव्यास असतात. वसतीगृहातील मुलींना दिला जाणाऱ्या भोजन ठेका हा खासगी व्यक्तीस देण्यात आलेला आहे. जेवणानंतर मुलींना त्रास जाणवू लागला होता. सायंकाळी मुलींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या पालकांनी देखील गर्दी केली होती. मुलींची प्रकृती आता स्थिर असून त्यांना उपचारानंतर दवाखान्यातून सुट्टी देण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
अधिकाऱ्यांची धावपळ - चिंचपाडा येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात जेवणानंतर मुलींना त्रास जाणवू लागल्याची माहिती नंदुरबार आदिवासी विकास विभाग प्रकल्पातील अधिकाऱ्यांना कळताच अचानक अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली. त्यांनी लागलीच चिंचपाडा वसतीगृह विसरवाडी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली तसंच विद्यार्थिनींची विचारपूस केली. दरम्यान अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या जेवणाची सॅम्पल घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं आहे.