मुंबई Ram Mandir Pranpratistha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं निघालेल्या मिरवणुकीवर हल्ला करणाऱ्या समाज कंटकांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. बुधवारी ठाणे न्यायालयानं सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसंच इतर आठ जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या 13 आरोपींपैकी चार जण अल्पवयीन असल्यानं त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
पोलिसांकडून 13 जणांची धरपकड : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथील नयानगर भागात समाजकंटकांनी रामभक्तांच्या मिरवणुकीवर हल्ला करत वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक तसंच भाजपा आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्त मधुकर पांडेसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर पोलिसांनी 13 जणांची धरपकड केली होती.
आरोपींनी पोलीस कोठडीत रवानगी : यानंतर दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात एका व्यक्तीनं त्याच्या फेसबुक पेजवर व्हिडिओ बनवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून आलं आहे. याप्रकरणी बुधवारी सर्व 13 आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयानं एकाला दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर इतर आठ आरोपींनाही न्यायालयानं 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिरवणुकीवर दगडफेक : सोमवारी अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर मीरारोड तसंच भाईंदरमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मीरा रोडवरील हैदरी चौकातून मिरवणूक जात असता समाजकंटकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी काही हल्लेखोरांनी दगडफेक देखील केली होती.
नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा : तसंच हल्लेखोरांनी मिरवणुकीत सहभागी लोकांना मारहाण करून वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली होती. यामध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून सुमारे 20 जणांना किरकोळ दुखापत झाली होती. जखमींमध्ये महिला तसंच लहान मुलांचा देखळी समावेश आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, परिस्थिती नियंत्रणात आणली होती. समाजात तेढ निर्माण करणे, अशा विविध कलमान्वये नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -