अमरावती ST Bus Burnt In Fire : मेळघाटात गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास यवतमाळवरुन चिखलदरा जाणारी एसटी बस मोठा गावालगत अचानक पेटली. बस पेटल्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी बसचा मात्र जळून कोळसा झाला. बसला आग लागल्याची माहिती प्रवाशांनी तत्काळ अग्निशमन दलाला दिली. मात्र अग्निशमन दलाची गाडी पाण्याविना घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे नागरिकांनी खासगी टँकर मागवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या बसचा जळून कोळसा झाला.
यवतमाळवरुन चिखलदरा जात होती बस : नेर आगाराची बस नेहमीप्रमाणं यवतमाळवरून चिखलदरा इथं जात असताना मोठा गावाच्या घाट वळणावर बसच्या समोरील इंजिन अचानक भडकलं. एसटी बस समोरुन पेटल्याचं चालकाला लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत वाहक आणि प्रवाशांना सूचित केलं. त्यामुळे वाहक चालकासह सर्व प्रवासी बसमधून पटकन खाली उतरले. यानंतर काही क्षणातच संपूर्ण बसला आग लागली.
पाण्याविना आले अग्निशमन दल : एकूण 25 प्रवासी या बसमध्ये होते, यापैकी पाच ते सहा प्रवासी हे मोठा येथील रहिवासी असल्यामुळे त्यांनी तत्काळ गावातील लोकांना या घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी चिखलदरा अग्निशमन दलाला या संदर्भात माहिती देताच अग्निशमन दलाचं वाहन घटनास्थळी पोहोचलं. मात्र त्यामध्ये पाणीच नसल्याचं लक्षात येताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यानंतर चिखलदरा इथून खासगी टँकर मागवण्यात आलं. तर मोठा वासियांनी गावातून टँकरवर पाणी आणून बस भिजवण्याचा प्रयत्न केला. ही बस मात्र आधीच पूर्णतः जळाली, अशी माहिती मोठा इथले रहिवासी गजानन शनवारे यांनी ई'टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
या गंभीर प्रकाराची होणार चौकशी, मुख्याधिकाऱ्यांनी दिले आदेश : "पेटलेली एसटी बसची आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचं वाहन घटनास्थळी पोहोचलं. मात्र त्यामध्ये पाणी नसणं ही निश्चितच गंभीर बाब आहे. मी नुकताच पदभार स्वीकारला असून चिखलदरा इथल्या अग्निशमन अधिकाऱ्याचा पदभार हा अंजनगाव सुर्जी येथील व्यक्तीकडं आहे. मी त्यांना सकाळीच चिखलदरा इथं पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल," असं चिखलदरा नगरपरिषद मुख्याधिकारी विजय लोहोकरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केलं.
हेही वाचा :