अमरावती Srishtivinayak : गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साह आणि आनंदाचं वातावरण असताना अमरावतीत गणेशोत्सवाची 65 वर्षांची परंपरा जोपासणाऱ्या श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळात यावर्षी चक्क पिंपळाच्या खोडात नैसर्गिकरीत्या प्रकट झालेल्या सृष्टीविनायकाची स्थापना करण्यात आली.
असा प्रकटला सृष्टीविनायक : श्रीकृष्ण पेठेत अमरावती महापालिकेच्या उद्यानात काही महिन्यांपूर्वी पिंपळाचं साठ वर्ष जुनं झाड कोसळलं. महापालिकेच्या उद्यान विभागानं या झाडाच्या फांद्या तोडून उद्यानातील जागा मोकळी केली. या वृक्षाचं भलं मोठं खोड मात्र उद्यानातच पडून होतं. उद्यानात फिरायला येणाऱ्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना या खोडामध्ये गणरायाचा आकार दिसायला लागला. श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी खोडातील या श्री गणेशाचं निरखून निरीक्षण केलं असता त्यामध्ये स्पष्टपणे श्रींचं दर्शन होत असल्याचं लक्षात आलं. यानंतर पिंपळाचं हे खोड उद्यानातील वड आणि उंबराच्या वृक्षाजवळ नेऊन ठेवलं. परिसरातील प्रल्हादराव झगेकर या सुतार काम करणाऱ्या व्यक्तीनं वृक्षात दिसणाऱ्या गणरायाच्या मूर्तीला सुबक आकार दिला. नैसर्गिकरीत्या प्रकटलेल्या या गणेशाचीच स्थापना यावर्षी गणेशोत्सवात करण्याचा निर्णय श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळानं घेतला.
खोडाला फुटली पालवी : श्री गणेश चतुर्थीला या गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच गणराया असणाऱ्या पिंपळाच्या या खोडाला हिरवी पालवी फुटायला लागली. वड, पिंपळ आणि उंबर यांना ब्रम्हा, विष्णू, महेश अशी धार्मिकदृष्ट्या मान्यता आहे. हे ब्रम्हा विष्णू आणि महेश श्रीकृष्ण पेठेतील महापालिकेच्या उद्यानात आज सृष्टीविनायकासह बहरले आहेत. श्रीकृष्ण पेठेत गणरायाच्या दर्शनासाठी येणारे भाविक सृष्टीतून प्रकटलेल्या या गणरायाचं रूप पाहून चकित होत आहेत.
सृष्टी वाचवण्याचा संदेश : श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळानं यावर्षी गणेशोत्सवात नैसर्गिकरित्या प्रकटलेल्या सृष्टी विनायकाची स्थापना केली असताना संत महात्म्यांनी सृष्टी संवर्धनासंदर्भात समाजाला दिलेल्या संदेशाचे फलक उद्यान परिसरात झळकवले आहेत. सृष्टी संवर्धनासंदर्भात संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानामधील संदेश, स्वराज्यातील आंबे, फणस असे वृक्ष लावून पुढच्या पिढीला फळ चाखू देण्यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्रक, पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक प्राणी हा सुखी राहावा या संदर्भात भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि गुरुनानक देवजी यांनी दिलेला संदेश, 'प्राणीमात्रांवर जे प्रेम करतात ते खरी ईश्वर सेवा करतात' या संदर्भात स्वामी विवेकानंदांनी समाजाला प्राणीमात्रानप्रती आपुलकी निर्माण करण्यासंदर्भात केलेली जागृती, "पशुपक्षी आणि मुक्या प्राण्यांना मारू नका त्यांना अभय द्या हीच खरी भक्ती व देवपूजा" ही संत गाडगेबाबांची शिकवण यासोबतच "कुठले राष्ट्र खरच किती महान आहे याची प्रचिती ही त्या राष्ट्रातील नागरिक प्राण्यांसोबत कसा व्यवहार करतात यावरून येते" असं महात्मा गांधींचं वक्तव्य आहे. असे सारे महत्वाचे संदेशफलक श्रीकृष्ण पेठ येथील गणेशोत्सव परिसरात लावून भाविकांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न गणेशोत्सव मंडळाच्या वतीने केला जातो आहे.
65 वर्षांची परंपरा : श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळात गत 65 वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा कायम आहे. गत वीस पंचवीस वर्षांपासून राज्यासह देशभरातील विविध गणपती मंदिरांचे देखावे या मंडळांनं साकारलेत. मुंबई येथील श्री सिद्धिविनायक, पुण्याचे दगडूशेठ हलवाई मंदिर, गणपतीपुळेसह अष्टविनायकातील सर्व गणपती मंदिरांचे देखावे, मालवण येथील गणपती मंदिर आणि इंदूर येथील गणपती मंदिर, दक्षिणेकडील गणपती मंदिराचे देखावे श्रीकृष्णपेठ गणेशोत्सव मंडळाने यापूर्वी साकारलेत.
कायमस्वरूपी राहणार सृष्टीविनायक : श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यावर्षी स्थापन करण्यात आलेल्या सृष्टी विनायकाचं विसर्जन केलं जाणार नाही. गणरायाची ही मूर्ती नैसर्गिकरीत्या पिंपळाच्या खोडात प्रकटली. याचं विसर्जन होऊच शकत नाही. या ठिकाणी वड आणि उंबरासोबत आता या पिंपळाच्या खोडाला देखील पालवी फुटली असून हे तिन्ही वृक्ष याच ठिकाणी कायमस्वरूपी असतील. या पिंपळाच्या खोडातील श्री गणेशाची आता या ठिकाणी कायमस्वरूपी पूजा होईल असं श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त मिलिंद चिमोटे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा..