मुंबई Speeding BMW Hits To Biker : जुलै महिन्याच्या सुरुवातीला वरळीत हिट अँड रन प्रकरणी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी घडल्यानं मोठी खळबळ उडाली. यानंतर शनिवारी 20 जुलैला वरळीत ठाण्यातील एका व्यावसायिकाच्या बीएमडब्ल्यू कारनं एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात विनोद लाड (वय वर्ष 28) हा तरुण गंभीर जखमी झाला. मागील आठ दिवसांपासून विनोद लाडवर उपचार सुरू होते. मात्र आठ दिवसांची झुंज अपयशी ठरली असून विनोद लाड याचा अखेर मृत्यू झाला आहे.
![Speeding BMW Hits To Biker](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/29-07-2024/mh-mum-7212052-290724-worlibmwcaraccidentboydeath_29072024085724_2907f_1722223644_118.jpg)
अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते : वरळी सीफेस इथल्या एजी खान अब्दुल गफार खान रोडवर 20 जुलैला मागून येणाऱ्या बीएमडब्ल्यूनं विनोदला धडक दिली. जेव्हा अपघात घडला, तेव्हा गाडी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर हा चालवत होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. अपघातानंतर तातडीनं विनोदला नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर तिथं उपचार सुरू होते, मात्र आठ दिवसानंतर उपचारादरम्यान विनोदचा अखेर मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विनोद हा मूळचा मालवण इथला रहिवासी आहे. विनोद ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता.
![Speeding BMW Hits To Biker](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/29-07-2024/mh-mum-7212052-290724-worlibmwcaraccidentboydeath_29072024085724_2907f_1722223644_887.jpg)
आठ दिवस मृत्यूशी झुंज : पाठीमागून गाडीनं ठोकल्यानंतर दुचाकीवरुन खाली पडून विनोदच्या डोक्याला गंभीर मार लागला. दुसरीकडं बीएमडब्ल्यू गाडी ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, वरळीतील फोर सिझन हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा घरगुती कार्यक्रम होता. या क्रार्यक्रमला व्यावसायिक आणि त्यांचं कुटुंब वरळीत आलं होतं. अपघातानंतर लगेच विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड यांच्या तक्रारीवरुन याबाबत वरळी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आठ दिवस विनोद मृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याची प्राणज्योत मालवली आहे. यामुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विनोदच्या नातेवाईकांनी केली आहे.
हेही वाचा :